गावांची सुधारणा व्हावी म्हणून ग्रामगीतेतील आचार नीतीचा वापर करावा. एक व्यक्ती म्हणाला, लोक कसे वागतात हे आम्हाला कळले, ते अनुकरणप्रिय आहेत, हे योग्यच आहे. यावरून असे वाटते की, गावातील नेते, पुढारी नक्कीच गाव सुधारु शकतात हे सर्व खरे आहे पण काही लोक स्वतःला शहाणे समजून गावांत त्यांनी थैमान घातले आहे. गाव सुधारणेसाठी प्रामाणिक लोक समोर येतात पण त्यांचे शत्रूच गावातील पुढारी झालेत. त्या पुढाऱ्यांचा गावात दरारा आहे. गावात सत्संग घडावा म्हणून पंडित बोलाविला पण त्यानेच गावात कलह निर्माण केला. मुलांना शिकविण्याकरिता, चरित्रवान बनविण्यासाठी शिक्षक ठेवला तर त्यानेच मुलांशी अनाचार केला. बिमारी बसावी म्हणून वैद्य आणला पण त्यानेच रोग्यास जहर पाजले. अशाने खरेच गावाची सुधारणा होईल का?
प्रथम कळू दे तुझी साधना । काय ठेवितोसि आपली धारणा ।
दिनचर्येची कैसी रचना । आहे तुझ्या ।।
खरी आत्मशुद्धी हाच लोकवशीकरण मंत्र आहे. राष्ट्रसंत म्हणतात, मी तुम्हाला गाव सुधारणेचे मर्म सांगतो. गाव सुधारण्याची तुमची धारणा काय आहे, तुझी दिनचर्या कशी आहे ते मला कळायला हवी. पुढारी जर गावात गुंड, व्यसनी व व्यभिचारी लोकांना स्थान देत असेल तर ह्या पुढारी लोकांकडून गावचे लोक काय बोध घेईल बरे ! आचरणानेच आपल्या अंगी लोकांना आकृष्ट करून घेण्याची शक्ती येईल. गावात अनेक पुढारी असले तरी मार्गात त्यांच्यामुळे अडथळे येवू शकत नाही. जो चांगले काम करावयास पुढे होतो, त्याची वाटच लोक नेहमी पाहत असतात. आपले आचरण चांगले असेल तर त्यानेच पुढारीपण प्राप्त होते. आचरणाने सत्याशी संबंध जोडला, त्यामुळेच सर्व लोकांची मते आपोआपच ओढल्या जातात. शुद्ध आचरणाचे सामर्थ्याने लोक प्रभावीत होतात.
ज्याने सत्याशी नाते जोडले । त्यांचे अंगी गुरुत्वाकर्षण आले ।
सांगण्याहुनिही सामर्थ्य चाले । त्याच्या शुद्ध जीवनाचे ।।
शुद्ध आचरणाचा मार्ग अवलंबून घेणे म्हणजे आपले इंद्रिये आपल्या स्वाधीन करून घेणे होय. खाणे-पिणे, वागण्यात सात्विक व पवित्रता आचरावी. चेहरा सुद्धा नेहमी प्रसन्न असावा. आपल्या आचरणात बुद्धी, शक्ती व चतुरता याचे तेज प्रगट झाले पाहिजे. प्रत्यक्ष चूक डोळ्यांनी पाहून किंवा विश्वासू माणसाकडून पूर्ण माहिती घेऊनच दोनही पक्षाचे म्हणणे पूर्ण ऐकून घेतल्याशिवाय न्याय निवाडा करु नये. तुमची वागणूक सात्विक आहे हे जेव्हा लोक ओळखतील तेव्हा ते तुम्हाला देवाप्रमाणे पाहतील आणि तुम्ही म्हणाल तसे लोक वागू लागतील. लोकांची सेवा करावी अशी जो इच्छा करील त्याने लोक काय म्हणतील ही लाज सोडावी. पुढारीपणाची अंगी कार्यशैली आपण घ्यावी व विचारपूर्वक तसे प्राणपणाने ते कार्य शेवटास न्यावे.
ज्यासि वाटे जनसेवा करावी । त्याने प्रथम लोक लाज सोडावी ।
आपल्या आत्म्याची ग्वाही घ्यावी । कार्य सत्य म्हणोनिया ।।
एकदा सत्कार्य करण्याचा निर्धार झाला की, लोकच सहाय्य करु लागतील व आपले काम करण्याचा मार्ग सोपा होईल. जो कोणी कार्यास सहकार्य करेल त्यांना आपले साथीदार निवडावे. चांगले कार्यकर्ते मिळाले की, आपले सत्कर्म पूर्णपणे आरंभावे व जनसेवेने पुण्य पदरात घ्यावे. गावी आदर्श योजना साकार करण्याचा सिद्धांत हाच आहे. खरे ज्ञान असेल त्यानेच समोर यावे. केवळ पोकळ बोलणाऱ्या लाख लोकांपेक्षा कामात पुढे होणारा एकच माणूस श्रेष्ठ समजावा. ज्योतिबा फुलेंच्या या वचनानुसार प्रत्येकाने आपआपला वाटा उचलावा. आपले गाव सेवाकार्य करून सुधारुन दाखवा. आपण सर्व मिळून गावात काम करु या ! सर्वांस गावाच्या सेवाकार्यात लावणे हाच ग्रामसुधारणेचा खरा मार्ग आहे.
लाख बोलक्यांहून थोर । एकचि माझा कर्तबगार ।
हे वचन पाळोनि सुंदर । गाव सुधारावे कार्याने ।।
लेखक:-पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....