कारंजा लाड : शुक्रवार दि. ५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजता काँग्रेसच्या वतीने येथील तहसील कार्यालय समोर निदर्शने करून आंदोलन करण्यात येणार आहे.
केंद्रातील भाजपा सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाईचा आगडोंब उसळला असतानाच जीवनाश्यक वस्तुंवरही जीएसटी लावून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावू पहात आहे. बेरोजगारीचा उच्चांक झाला असून तरुणवर्गाचे भवितव्य अंधारात आहे. महागाई, बरोजगारी व ढासळत्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले व वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार अमित झनक यांच्या निर्देशानुसार शुक्रवार दि. ५ ऑगस्ट रोजी प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भोजराज यांच्या नेतृत्वात कारंजा शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कारंजा तहसिल कार्यालय समोर निदर्शने करून आंदोलन करण्यात येणार आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, सीएनजी, पीएनजीचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. महागाईने जनता त्रस्त असताना केंद्र सरकारने दूध, दही, पनीर, आटा, तेल, तूप यासह जीवनावश्यक वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. मोदी सरकारने जीएसटीतून शाळकरी मुलांनाही सोडले नाही, शालेय वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. रुग्णालयात उपचार घेण्यावरही जीएसटी भरावा लागणार आहे. मागील ४५ वर्षातील बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. २०१४ ते २०२२ पर्यंत विविध विभागांमध्ये नोकऱ्यांसाठी २२ कोटी अर्ज मिळाले मात्र केवळ ७ लाख उमेदवारांना नोकरी देण्यात आल्याचे केंद्र सरकारनेच लोकसभेत सांगितले आहे. एवढी भयानक अवस्था आहे. तर लष्करात भरती होऊन देशाची सेवा करु पाहणाऱ्या तरुणांना फक्त ४ वर्षाची सेवा व नंतर निवृत्ती अशी ‘ अग्निपथ नावाची योजना आणली आहे. या योजनेला तरुण वर्गांचा तीव्र विरोध असून काँग्रेस पक्ष तरुणांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. ही योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे.
अतिवृष्टीमुळे विदर्भ, राज्य तसेच कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांचे व नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी तसेच राज्य व कारंजा तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा.
या मागणी करिता कारंजा तहसिल कार्यालय समोर सकाळी ११ वाजता काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन केंद्र सरकारच्या विरोधातील आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन कारंजा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रमेश पाटील लांडकर व कारंजा शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमीर खान पठाण* यांनी केले आहे. असे काँग्रेसचे स्थानिक ज्येष्ठ नेते तथा माजी सरपंच प्रदिप वानखडे यांनी कळविले आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....