आभाळा एवढी उंची असलेले काहीच व्यक्ति जन्माला येतात.कर्तुत्व आभाळा एवढं पण अहंकार मात्र शून्य.असेच एक शिक्षकांच्या स्वप्नपूर्तीचे विशाल नाव आहे, माझे वडील शिक्षक आमदार किरणराव सरनाईक.1961 सालच्या महर्षी स्व.आप्पासाहेब सरनाईक यांच्या
शिवाजी शिक्षण संस्थेला सर्वोच्च आणि परमोच्च बनवीण्यात आणि संस्थेच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्याचे काम माझे वडील श्री किरणराव सरनाईक यांनी केले आहे.संपूर्ण अमरावती विभागाचे नेतृत्व शिक्षकांच्या वतीने आज ते करीत आहेत.
माझ्या वडिलांनी. 2020 ची अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघाची निवडणूक जिंकून विभागातील संपूर्ण शिक्षकांची स्वप्ने फुलविली आहेत.वाशीमला लावलेल्या प्राजक्ताची सुंदर फुले अमरावती विभागातील संपूर्ण शिक्षकांच्या दारात पडत आहेत.आमदारकी कुणाचीही असो,पण शिक्षण क्षेत्रातले प्रश्न मात्र सुटले पाहिजेत ही विशाल भूमिका घेऊन मागील 40 वर्षापासून त्यांनी आपले संपूर्ण जीवनच शिक्षण क्षेत्राशी समर्पित आहे.बंद पडणाऱ्या मराठी शाळा,संसार मोडून पडलेला शिक्षक,शिक्षणाचे खाजगीकरण,महागडे खाजगी शिक्षण,मराठी अस्मितेचा होणारा लय यासाठी व शिक्षकांच्या हक्कासाठी त्यांनी दोन तपाहून अधिक साधना केली आहे. सुशांत,निगर्वी स्वभाव आणि तेजस्वी वाणी यामुळे त्यांनी दोन वर्षापूर्वीची अमरावती विधानपरिषद संघाची निवडणूक निर्विवादपणे जिंकलीआहे. ही निवडणूक त्यांनी स्वतःसाठी नाही तर प्रत्येक शिक्षकाच्या न्याय्य हक्का करीता जिंकली आहे. त्यामुळे मी शिक्षकांच्या हितासाठी आमदार आहे. ही दातृत्त्वाची भावना त्यांच्या हृदयात आज कायम आहे.
जिंकलो मी असाच नाही सर्वांशी आहे प्रेम निरंतर।
काय प्रभूंनी द्यावे आणखी सारे दिले केवळ निरंतर।।
अशी समाधान व संयमाची पवित्र भावना त्यांच्यात आहे.
काही व्यक्तीकडे सागरालाही आव्हान देण्याची क्षमता असते.हीच माणसं यशस्वी होतात व कर्तृत्व गाजवतात.आमदार झाल्यापासून चार-पाच महिन्यातच त्यांनी 20% अनुदानाचा प्रश्न सोडवला. व वीस वर्षापासून वंचित असलेला शिक्षक स्थिरावला.संच मान्यता आणि शिक्षकांचे अनेक प्रश्न त्यांनी आज मार्गी लावलेले आहेत. ते शिक्षकांच्या प्रश्नांची पूर्तता करण्यासाठी सतत कार्यरत आहेत.पाचही जिल्ह्यात प्रत्येक शाळेत ग्रीन बोर्डाचे वाटप त्यांनी केले आहे.
आपण फक्त निमित्त असून शिक्षकांच्या ऊर्जेने व परमेश्वराच्या कृपेने कामे करतो, ही सेवाधारी भावना त्यांच्या हृदयात आहे.
हा मनाचा निगर्वीपणा व मोठेपणा काही निवडक लोकाकडेच असतो.एखाद्या व्यक्तीने संपूर्ण समर्पित व्हावे व नंतर उच्चपदाची आस बाळगावी आणि एवढी प्रचंड साधना असावी की,परमेश्वराने सुद्धा विचारावे की,बंदे तेरी रजा क्या है।
एखाद्या पदाचा मान व शान आणि कर्तुत्व पूर्ण करण्यासाठी मनाचा मोठेपणा व समर्पित भावना असावी लागते.ती माझ्या बाबांकडे नक्कीच आहे.
2018 साली शिक्षक संघटना स्थापन करून त्यांनी एखाद्या झंजावाता प्रमाणे दोनच वर्षात शिक्षक व शिक्षण क्षेत्राच्या मुळाशी जाऊन,अनेक प्रश्नांना भिडून शिक्षण क्षेत्राचा पाया कायापालट घडवण्यासाठी अनेक प्रश्नांची व समस्यांची मुळे शोधून काढली.वाशिम सारख्या छोट्या जिल्ह्याला 56 तालुके आणि पाच जिल्ह्यांचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी.हे वाशिम जिल्ह्याचे सौभाग्य आहे.आज पर्यंत शिक्षकांच्या मनाचा ठाव कोणत्याच लोकप्रतिनिधीला घेता आलेला नाही.खडू आणि फळा सहा वर्षात नावाला शिल्लक राहिला की नाही याची खंत करायची नाही.पण नावातच किरण असलेले माझे वडील किरणराव यांनी शिक्षक व शिक्षणाच्या मुळाशी जाऊन या प्रश्नाचे मूळ शोधून काढलेले आहे.दोन तपापासूनच शिक्षण क्षेत्रातला हा अंधकार नष्ट करण्यासाठी हे सतीचे व्रत त्यांनी घेतलेआहे.शिक्षक आमदारकीच्या रूपाने त्यांच्या कर्तुत्वाला सुंदर फळे आलेली आहेत.
एवढे यश,वैभव व कीर्ती असताना त्यांनी मी नाही तर शिक्षकच आमदारआहेत.तेच जिंकले. मी फक्त प्रार्थना केली आणि ती सफल झाली.असे म्हटले आहे. इमानदारीने काम करणाऱ्यांची लोकशाहीत आजही किंमत केली जाते व कोणावर टीका न करताही जिंकता येते.हे वडिलांनी निवडणुकीत सिद्ध केले.फक्त तीनशे मावळ्यांच्या विश्वासावर आजही जिंकता येते. व लोकशाहीचा प्रकाश आपल्या दारी आणता येतो.अशाप्रकारचा विश्वास आणि प्रामाणिकपणा त्यांनी आमच्या शिवाजी परिवारात तयार केला आहे. भविष्यकालीन नियोजनाचे ते विकास पुरुष आहेत. तेरे दिल में ना सही, ना मेरे दिल में सही, लेकिन ये आग कहीना कही, तो लग जानी चाहिए। ही कल्याणाची भावना त्यांनी ह्र्दयात ठेवली आहे. विभागातील सर्व शिक्षकांचा विश्वास त्यांनी संपादन केलेला असून ,
येऊ दे वाणीत माझ्या,
सुर तुझ्या आवडीचे ।। ही मंगलमय भावना त्यांच्या हृदयात आहे.
शिक्षकांची एक प्रार्थना त्यांच्या विजयाने सफल झाली आहे.वात एकटीच जळली तर जळून भस्म होते पण तिला तेल व वात आणि समई यांची साथ मिळाली.तर ती परिसर प्रकाशमान करते.म्हणून जळावे तर समई सारखे शांत,व प्रकाश द्यावा ज्योतीसारखा निवांत आणि विलीन व्हावे कापुरासारखे संपूर्ण.अगदी हीच महाआरती साकार झाली आहे.ज्योती सारखे प्रकाशमान व्यक्ती किरणराव,समई सारखा शांततेने तेवत राहणारा शिवाजी परिवार,कापुरासारखी विलीन झालेली शिक्षक संघटना,प्रसादाची वाट पाहणारा शिक्षक वर्ग आणि ज्यांच्यासाठी लढाई आहे तो शिक्षक मतदार,यांच्यासाठी समर्पित असलेले आमदार किरणराव सरनाईक आहेत.
ज्यांच्याकडे कर्तुत्वाचा सुगंध व माणुसकीचा गंध आहे अशांना संकटावर मात करून जिंकता येते.विं.दा. करंदीकर म्हणतात,
असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर।
नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
असे कर्तृत्व असलेला रणवीर व रणशूर असतो.माझे वडील यात प्रवीण असून
शिक्षकांच्या स्वप्नपूर्तीचे किमयागार आहेत.
मला आयुष्यात प्रचंड उंचीवर नेऊन चांगले सुसंस्कार,प्रेम,शिक्षण,आनंद,सुख समाधान,देऊन गौरविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.एक सुजाण पालक,समर्थ नेता,प्रेमळ व कुटुंबवत्सल पिता,सह्र्दयी व विशाल मनाचा माणूस, शिवाजी परिवाराचे कुटुंबप्रमुख,सालस, निगर्वी,साहसी, निर्भय,अजातशत्रू,असे विशाल गुणी व्यक्तिमत्व माझ्या वडीलां जवळ आहे.याचा मला प्रचंड अभिमान आहे.
माती खालची नाती सांभाळणारा,मातीचे भूषण असणारा एक भूमिपुत्र या वाशिमचे भाग्य आहे.मराठी माती,मराठी संस्कृती यांच्या विषयी विशेष प्रेम असणारा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे.14 सप्टेंबर हा त्यांचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांना कोटी कोटी शुभेच्छा व मंगलमय प्रार्थना त्यांच्या कार्याला सलाम ..!
डॉ. स्नेहदीप किरणराव सरनाईक
अध्यक्ष : श्री.शिवाजी किड्स आणि महाविद्यालय विकास समिती,श्री.रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय वाशीम*
आपल्या प्रतिक्रिया द्या....