वाशिम (जिल्हा प्रातिनिधी संजय कडोळे) : २९ ऑगस्ट हा हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. हॉकीच्या खेळात ध्यानचंद यांनी अविश्वसनीय कामगिरीची नोंद केली आहे. त्यांच्या कारकिर्दीत भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत तीनवेळा सन १९२८, १९३२ आणि १९३६ या वर्षात सुवर्ण पदक जिंकले आहे. दशकानंतरही त्यांची जादू क्रीडा क्षेत्रात कायम आहे. मेजर ध्यानचंद हे भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहे. केंद्र सरकारने १९५६ मध्ये मेजर ध्यानचंद यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांची क्रीडा क्षेत्रातील कार्याची नोंद घेवून केंद्र सरकारने त्यांचा जन्मदिवस २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन साजरा करण्यात यावा असे निर्देश दिले आहे. या निमिताने जिल्हयात विविध क्रीडाविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आट्या पाट्या या खेळात अतिउच्च कामगिरी केल्याबद्दल क्रीडा विभागाच्या वतीने मंगरुळपीर तालुक्यातील मानोली येथील अजित बुरे यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार घोषीत करण्यात आला आहे. या निमिताने श्री. बुरे यांचा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिमच्या वतीने सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. यावेळी विविध खेळांमध्ये राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करून जिल्ह्याचे नांव लौकीक केलेल्या खेळाडूंचा सुध्दा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सत्कार ठेवण्यात आला आहे.
जिल्ह्यातील विविध खेळाच्या क्रीडा संघटनांनी त्यांनी आपल्या खेळामध्ये राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करणाऱ्या खेळाडूंची नावे प्रमाणपत्रासह या कार्यालयास कळविण्यात यावी. सन २०२३-२४ या वर्षात जिल्हास्तर स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करणाऱ्या शाळा व खेळाडूंचा सुध्दा सत्कार करण्यात येणार आहे. जिल्हयातील पोलीस विभाग, वित्त विभाग व महसुल विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध खेळांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. वयोगट १८ ते ४० वर्षाकरीता १०० मीटर धावने, योगा, फुटबॉल, बॅडमिंटन, कॅरम व आर्म रेसलिंग. वयोगट ४१ ते ६० वर्षापर्यंत ५० मीटर धावने, ३०० मी. धावने, १ कि.मी. चालणे, खो-खो- योगा, बॅडमिंटन, कॅरम, चेस व आर्म रेसलिंग आणि वयोगट ६० च्या वर स्पर्धकांसाठी ३०० मीटर जोरात चालणे, १ किमी चालणे, चेस, कॅरम व बॅडमिंटन इत्यादी खेळांचा सहभाग असणार आहे. ईच्छुक स्पर्धेकानी स्पर्धेत सहभाग घेण्याकरीता व अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे (८८८८३६६३७२) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी कळविले आहे.