चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने स्थानिक घुटकाळा वॉर्ड येथील चंद्रपूर ट्रान्सपोर्ट या गोडाऊनवर कारवाई करून ६२५ किलो तसेच इतर ३ दुकानांवर कारवाई करून ३० किलो असे एकुण ६५५ किलो प्लास्टीक जप्त केले आहे.उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणातील पथकास चंद्रपूर ट्रान्सपोर्ट येथे मोठ्या प्रमाणात प्लास्टीक साठा केला गेला असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे पाहणी केली असता ६२५ किलो प्लास्टीकचा साठा गोडाऊन मधे आढळुन आला. बंदी असलेल्या प्लास्टीकचा साठा केल्याने सदर माल जप्त करण्यात आला असुन गोडाऊन मालकास ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
उपायुक्त मंगेश खवले यांच्या नियंत्रणातील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे गोकुळ गल्ली मधील आशापुरी प्लास्टीक येथे कारवाई केली. डिस्पोझेबल ग्लास,प्लास्टीक पिशवी,कंटेनर,पात्र,चमचे इत्यादी प्लास्टीकचे साहित्य जप्त करण्यात आले व तिसऱ्यांदा प्लास्टीक साठा आढळल्याने २५ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण टॉकीज जवळील गुरुकृपा प्लास्टीक येथे दुसऱ्यांदा साठा आढळल्याने १० हजार तर टिळक मैदान येथील ओम प्लास्टिक यांच्याकडून १००० रुपये असा एकूण रुपये ३६ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला.