देसाईगंज २७ सप्टेंबर : शाळेतून पोटात दुखत असल्याने घरी जाते असे सांगून अल्पवयीन विद्यार्थिनी सात दिवसांपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. इच्छा प्रकाश बगमारे (१३) रा. राजेंद्रवॉर्ड, देसाईगंज ता. देसाईगंज जि.गडचिरोली असे बेपत्ता असलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, इच्छा बगमारे ही देसाईगंज येथीलच महात्मा गांधी विद्यालयात शिक्षण घेत होती. नेहमीप्रमाणे २० सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता आपल्या घरून शिक्षण घेत असलेल्या महात्मा गांधी विद्यालयात गेली. दरम्यान दुपारी ०१.३० वाजताच्या सुमारास पोटात दुखत असल्याने घरी जाते असे सांगून ती शाळेतून निघाली परंतु घरी परतली नाही. घरी परत न आल्याने कुटुंबातील व्यक्तींनी सर्वत्र शोधाशोध केली, आजूबाजूच्या गावात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतले मात्र मिळून आली नाही. याबाबत २१ सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन देसाईगंज येथे बेपत्ता असल्याबाबत कुटुंबातील व्यक्तींनी तक्रार दाखल केली. मुलीचे वय १३ वर्ष, उंची ४ फूट, बांधा-सडपातळ, रंग-सावळा, केस-लांब, चेहरा-गोल, भाषा-मराठी असे वर्णन असून सदर वर्णनाची मुलगी हिच्याविषयी माहिती मिळाल्यास किंवा कुठेही आढळून आल्यास पोलीस स्टेशन देसाईगंज येथील 07137 295227, 9579617306 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मात्र सात दिवस लोटूनही अद्याप मुलगी मिळून न आल्याने घातपात तर झाला नाही ना ? कोणती अनुचित घटना तर घडली नाही ना ? असे प्रश्न उपस्थित होत असून देसाईगंज पोलीस या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने करीत आहे.