अकोला : - ३ ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्री उत्सव सुरु होत आहे. आई दुर्गेचा हा महोत्सव संपूर्ण देशात अत्यंत थाटात साजरा करण्यात येतो. दुर्गा तसेच शारदा मंडळातर्फ नऊ दिवसपर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सार्वजनिक दुर्गा तसेच शारदा उत्सव मंडळांनी उत्सवादरम्यान देवीची भक्तीगीतेच वाजवावीत. पवित्रता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. अनेक लहान - मोठे मंडळ "गरबा", चे आयोजन करतात. गरबा नृत्य हे बॉलीवूड च्या सिनेमा प्रमाणे उथळ आणि अंगप्रदर्शन करणारे भडक नसून, या नृत्याला सांस्कृतिक परंपरा आहे. गरबा आयोजकांनी नृत्यात सहभागी होणारे पुरुष तसेच स्त्रीया भारतीय संस्कृतीनुसार वस्त्र परिधान करूनच येतील याची काळजी घ्यावी. कार्यक्रमा दरम्यान असामाजिक तत्वांचा प्रवेश होऊन कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही या दृष्टीकोनातून आधारकार्ड तपासावेत, सी सी टीव्ही कॅमेरा लावावेत, मंडळाचे स्वयंसेवक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त करावेत तसेच पोलीस प्रशासनाचे सहकार्य घ्यावे. असे आवाहन सनातन संस्कृती महासंघातर्फे करण्यात आले असल्याचे प्रसिद्धीप्रमुख विजय केंदरकर, मिलिंद गायकवाड आणि देवानंद गहिले यांनी कळविले आहे.