मोहाडी तालुक्यातील सीतेपार टोला शेतशिवारात वन्यप्राण्यांपासून धान पिकांचे संरक्षण करण्यासाठी लावलेल्या विद्युत प्रवाही ताऱ्यामुळे एका युवकाचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी (दि.४ ऑक्टोबर) सायंकाळी घडली. मृत युवकाचे नाव गंगाधर प्रल्हाद उके (वय ३२, रा. किसनपूर मोठा) आहे.
माहितीनुसार, गंगाधर उके मित्र दिलवर केवट उके सोबत काही कामासाठी बाहेर जात होता. किसनपूर (मोठा) गाव जंगलाच्या कुशीत असल्याने सीतेपार टोला येथे जाण्यासाठी शेतातून जाणारा एक कच्चा मार्ग आहे. या मार्गावर शेतमालक प्रशांत गेडाम यांनी वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी विद्युत प्रवाही तार लावली होती.
मार्गाने जाताना पुढे असलेला मित्र दिलवर उके विजेच्या ताऱ्याला हात लावल्याने त्याला धक्का बसला. मागे असलेला गंगाधर उके मित्राला तारांतून मुक्त करण्यासाठी पुढे धावला, मात्र त्याचवेळी त्यालाही विजेचा तीव्र प्रवाह लागून जागीच मृत्यू झाला. दिलवर उकेने स्वत:चा जीव वाचवला.
घटना समजताच परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले, आणि मृताच्या नातेवाइकांच्या आगमनापूर्वीच शेतमालकाने तार काढून ठेवली होती. घटना गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांच्या सीमेवर घडल्यामुळे सुरुवातीला पोलिसांमध्ये गोंधळ निर्माण झाला; मात्र तिरोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने तिथे गुन्ह्याची नोंद झाली.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक लोकांनी वन्यप्राण्यांपासून संरक्षणाच्या नावाखाली जीवघेण्या उपाय थांबवावेत, अशी मागणी केली आहे.