कारंजा : धार्मिक कार्यात नेहमी सहभागी असणारे राजकिय कार्यकर्ते आपण नेहमीच बघतो परंतु ज्योतीताई गणेशपुरे ह्या इतर लोकांना अपवाद असून त्यांची सातत्याने सामाजिक, आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात धडपड सुरु असते. आणि कोणत्याही सेवाकार्यात त्या हिरीरीने आणि तन मन धनाने सहभागी होत असतात. याचा प्रत्यय पुन्हा एकदा काजळेश्वर येथील संत सेवालाल महाराज जयंती समारोहात बघायला मिळाला आहे.जगद्गुरु संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्ताने निघालेल्या मिवरणूकी मध्ये सहभागी होऊन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ ज्योतिताई गणेशपुरे यांनी बंजारा समाजाचे आराध्य दैवत जगदगुरु संत सेवालाल महाराजांची पूजा आरती केली.यावेळी काजळेश्वर येथील तमाम बंजारा समाज बंधु भगीनी ह्या उपस्थित होत्या.
भिमा नायक आणि धरमणी या गोर दांपत्याच्या घरी क्रांतीकारी सेवालाल महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपुर जिल्ह्यात तसेच गुत्ती तालुक्यातील गोलालडोडी या ठिकाणी झाला . ते लहानपणापासूनच आपला परिवार आणि तांड्याप्रती प्रामाणिक, चाणाक्ष, बुद्धिमान आणि शुरविर होते. त्यांनी जीवनभर ब्रम्हचर्य व्रत धारण केले होते. निसर्ग आणि प्राणीमात्रांवर त्यांचे अतोनात प्रेम होते. " सेन सायी वेस, कीडी मुंगीनं सायी वेस" ही विश्व व्यापी कल्याणकारी प्रार्थना केली. त्यांच्याकडे लहान-थोर, उच्च-निच, गरीब-श्रीमंत हा भेदभाव नव्हता. लहानपणापासूनच गुरे राखण्याचे काम करुन वडीलांच्या प्रतिष्ठेला कुठल्याही प्रकारचा धक्का पोहोचणार नाही, याची काळजी घ्यायचे. त्यांनी मुर्ती पुजेऐवजी निसर्ग पुजेला महत्त्व दिले. त्यांच्याकडे एक गोपालक आणि तांड्याचे नायक म्हणून फार मोठी दुरदृष्टी होती. समाजाचे हित शिक्षणात आहे, हे हेरूनच तांड्यातील प्रत्येक मुला मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे. व्यसनांपासून लोक परावृत्त झाले पाहिजे याकरिता त्यांनी गित, लडी आणि भजनाच्या माध्यमातून आयुष्यभर प्रबोधन केले.
जेव्हा क्रांतीकारी सेवालाल महाराज जन्माला आले तेव्हा वैदिक परंपरेचा काळ होता. या काळात भांडवलशाही, सरंजामशाही आणि निजामशाहीने जणू कहरच केला होता. अंधश्रध्दा आणि वैदिक कर्मकांडात सर्वसामान्य माणूस होरपळून निघत होता. पुढे देखील हिच परिस्थिती राहिली तर देव, देऊळ आणि धर्माच्या नावाखाली वैदिक परंपरावादी आयतखाऊ लोकांकडून समाज लुटला जाईल. म्हणून समाजाला यातून बाहेर काढणे अत्यंत गरजेचे आहे. अशावेळी समाजावरील भविष्यातील संकट ओळखून क्रांतीकारी सेवालाल महाराजांनी वैदिक परंपरेविरोधात दंड थोपटले. " केनी भजो मत केनी पूजो मत" असे सांगून "करणी करेर सीको" "तमार जीवणेमं तमज वजाळो कर सको छो", हा आर्थिक विकासाचा मुलमंत्र दिला. शिवाय माझ्या समाजाकडे उदरनिर्वाह चालविण्यासाठी शेतीवाडी नसल्यामुळे पुढे चालून त्याची आर्थिक परिस्थिती खालावण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून सेवालाल महाराजांनी रपीयार तेरं चणा वकजाये, मलकेर वात पलकेम कळजाये, रपीया कटोरो पाणी वकजाये, वानावानार दक आये, लंडीरो राज आये .अशी अनेक भाकीते वर्तवली. ती आज प्रत्यक्षात खरी ठरली जात आहेत. महाराजांनी केलेल्या भाकीतांचे लोकांनी तंतोतंत पालन केले असते तर गोर बंजारा समाजाचे चित्र आज काही औरच दिसले असते. पण तसे झाले नाही हे समाजाचे फार मोठे दुर्दैवच म्हणावे लागेल.
याशिवाय व्यसनमुक्त समाजाची निर्मिती व्हावी म्हणून सेवालाल महाराजांनी समाजाला " पाच पारा" नावाचे तत्वज्ञान सांगितले . त्याचे पालन केल्यास मानवी जीवन सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही, हे ठणकावून सांगितले. परंतु अंधश्रध्दा आणि वैदिक कर्मकांडात आकंठ बुडालेल्या भारतीय समाजाने सेवालाल महाराजांनी सांगितलेल्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. इतकेच नाही तर त्यांनी विज्ञानवादी विचारांचा प्रचार प्रसार केला. निसर्गाच्या सान्निध्यात राहून नैसर्गिक जीवन जगा, कोणत्याही विषयात भेदभाव करू नका, सगळ्यांशी प्रामाणिक राहून सन्मानाने जगा, स्त्री ही मातेसमान असून तिच्यावर सन्मानाने जगा, चोरी करु नका, व्यसनमुक्त जीवन जगा, भुकेलेल्यांना अन्न द्या आणि गरजूंना मदत करा, वडिलधारी लोकांचा आदर करा आणि सगळ्या प्राणीमात्रांना प्रेम द्या, आधुनिक जीवनशैली आणि सांत्वन देऊन आमिषाला बळी घेऊ नका, माणसाला हानी पोहोचेल असे कोणतेही सण उत्सव साजरे करु नका, आई वडिलांची सेवा करा, बोलीभाषा आणि संस्कृती यांचे जतन आणि संवर्धन करा, दिसण्यावर जाऊ नका तर दिसते त्याच्यामागे काय दडले आहे त्याचा शोध घ्या असा साधा आणि सोप्या भाषेत उपदेश दिला. इतकेच नव्हे तर मुघलांच्या अघोरी राजवटीत अनेक लढाया जिंकून त्यांचे साम्राज्य मुळासकट उखडून टाकले. म्हणून त्यांच्याकडे महान तत्वज्ञानी, भविष्यवेत्ता, थोर समाजसुधारक, क्रांतीकारी योध्दा आणि विज्ञान प्रामाण्यवादी म्हणून पाहिले जाते.अशा या थोर क्रांतीकारी सेवालाल महाराजांनी ४ डिसेंबर १८०६ ला जीवंत समाधी घेतली. क्रांतीकारी सेवालाल महाराज यांच्या मृत्यु बाबतची अधिकृत तारीख नाही.संशोधक व अभ्यासक मृत्युच्या तारखेचा अभ्यास करीत आहे . वाशिम जिल्ह्यातील पोहरागड येथे त्यांची समाधी आहे, जी देश विदेशातील गोर बंजारा समाजाची काशी म्हणून नावारूपास आलेली आहे. येथे दरवर्षी लाखो भाविक सेवालाल महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी करतात.अशा जगदगुरु संत सेवालाल महाराज यांची जयंती काजळेश्वर येथे समाजबांधवाकडून मोठ्या आनंदोत्साहात साजरी करण्यात आल्याचे वृत्त आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांना मिळाले असून या धार्मिक उत्सवात माजी अध्यक्षा सौ ज्योतिताई गणेशपुरे यांनी सहभाग घेऊन धार्मिक लोकगीते आणि पारंपारिक नृत्यावर ठेका धरल्याचे वृत्त मिळाले आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....