मरणाची पूर्व तयारी...!
जीवन अमर आहे. त्याच्या मृत्यूचा प्रश्नच येत नाही. अविनाशी आत्मा सदोदित तसाच असतो व सदैव तसाच राहणार. शरीराच्या मृत्यूस लोक आपला मृत्यू मानतात. एवढ्याच साठी लोक मरणास भितात. अंतःकरणास जेव्हा निश्चयपूर्वक विश्वास होईल की, आजच्या सारखेच पुढे सदैव आम्ही जीवंत राहणार आहोत. तर मरणाच्या भितीचे कोणतेच कारण उरत नाही.
सारे जग मृत्यूकडे धाव घेत आहे. आपल्याहून वडील माणसे गेली, बरोबरीची गेली, लहान गेली, घरची गेली, बाहेरची गेली, जवळची गेली, दूरची गेली आणि आपण त्याच मार्गावर आहोत. असा अनुभव साक्षात् असताना आपण येथे कायम आहोत, ही भावना ठेवून वागतो. तेव्हा देवाला हसू येत असेल.
"मृत्यू हा मनुष्याला त्याच्या चांगल्या वा वाईट इच्छेच्या कार्याकरिता ताजातवाना करुन देणारी विश्रांती आहे ! म्हणूनच ज्ञानी लोक मृत्यूला आपली शुभ वेळ समजतात."(राष्ट्रसंत तुकडोजी महाराज)
जो जन्मास येतो तो मरणारच, हे सत्य आहे. आम्हासही एक दिवस मृत्यूच्या मांडीवर झोपायचे आहे. त्या महायात्रेची पूर्व तयारी जर आतापासूनच सुरू केली तर आज मृत्यूचे जे भय व दुःख वाटते ते वाटणार नाही. मरण तर अजून खूप दूर आहे. म्हणून टाळत राहणे योग्य नव्हे. आपणास हा मानव देह महत् प्रयासाने लाभला. अशा बहुमोल देहाचा सदुपयोग न करता तो व्यर्थ घालवणे, यासारखी मूर्खपणाची दुसरी कोणतीही गोष्ट असू शकेल?
कीर्ती तोची स्वर्ग खरा ।
अपकिर्ती नरकाचा पसारा ।
याच जगी यांचा व्याप सारा ।
पाहती प्राणी ।।
मृत्यूनंतर आपले नाव कीर्ती रुपाने उरावे म्हणून चांगले कर्म करणे गरजेचे आहे. पाप कर्माचे फळ नरक असते. पुण्य कर्माचे फळ स्वर्ग होय. प्रेमाने व पवित्रपणे केलेले कार्य पुण्य तर स्वार्थ आणि पाखंडपणाने केलेले कृत्य पाप समजावे. स्वर्ग व नरक ही कल्पना या पृथ्वीवरच आहे. माणसाचा जन्म लाभला तर या जन्मात ईश्वराचे नामस्मरण करता येते. इतर प्राणी, पक्षी यांच्या योनीत ईश्वर नामाची प्राप्ती शक्य नाही. मृत्यू हा आमच्या डोक्यावर नाचत असतो. क्षणाचा भरवसा नाही. न जाणो कोणत्या क्षणी मृत्यू आमचा गळा दाबून प्राण घेईल. आज आपण अनेक स्वप्ने रंगविली पण उद्या ती सारी एका क्षणात विरुन जातील म्हणून..... !
उद्या करायचे, आज करा काही ।
भरवसाची नाही आयुष्याचा ।।
रोटी, कपडा, मकान इतकेच महत्त्वाचे नाही. जीवन काय आहे? आमचा जन्म घेण्याचा उद्देश कोणता आहे? या प्रश्नावर चिंतन, मनन कराल तर तुम्ही मृत्यूच्या पूर्व तयारीच्या मार्गास लागले असे समजावे लागेल. उद्या करावयाचे कामाचे वेध आजपासूनच लागले पाहिजे. जगातील सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी ईश्वराची मूर्ती बघा. पत्नीस दासी मानू नका तर देवी माना. पुत्रास गणेशा समान माना. जिला तू पत्नी समजतोस ती असंख्य जन्मात तुझी आई बनली आहे. सोने, चांदी तुझे नाही. हे सारे प्रकृतीचे आहे. अंधकाराकडून प्रकाशाकडे चला. मृत्यूकडून अमृताकडे चला. ईश्वर प्रेमस्वरुप आहे. प्रेमाची उपासना करा.
मृत्यूची पूर्व तयारी म्हणून आजपासूनच आत्म्याच्या विशुद्ध स्वरुपाचे चिंतन सुरू करा. आपल्याला ज्ञान होताच माया मोहाचे बंधन आपोआपच गळून पडेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात.
हरिनाम जपा, मन लावूनिया ।
मग मोक्ष सुखा, किती वेळ असे ।।
लेखक:
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....