अकोला ः मौजे शिवणी येथील शेत सर्व्हे क्र. 69/2, 69/2 अ व 69/2 ब मधील 4 हेक्टर 57 आर ही मय्यत शिवराम कोपुल यांच्या मालकीची शेतजमिन होती. त्यांच्या मृत्यूनंतर सदर शेत जमिन त्यांच्या 6 वारसांनी अकोल्यातील उद्योजक नितीन जोशी यांना इसार पावतीद्वारे विक्री व्यवहार करून त्यानंतर परस्पर दुसर्यांना विकल्यामुळे त्यांची या व्यवहारात 1 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची खळबळजनक घटना अकोल्यात घडली आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही पोलिस व महसूल विभागाच्या उदासिनतेमुळे शेवटी जोशी यांना न्यायालयात धाव घ्यावी लागली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुळ जमिनदार मयत शिवराम कोपूल यांचे 6 वारस दिलीप, उमेश, एलराज, रविंद्र, चित्रलेखा बाळकृष्ण दामले, माधुरी हरीश पडगील यांची नावे त्यांच्या मालमत्तेचे वारसदार आहेत. यातील रविंद्र यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारस लक्ष्मीबाई, लिना, अमित आणि सुनिता भोपेंद्र घंटेकर आणि चित्रलेखा दामले यांच्या मृत्यूनंतर मनोज आणि अर्चना असे वारस झाले.
यातील दिलीप, उमेश आणि रविंद्र यांच्या वारसांनी या मालमत्तेला त्यांचेशिवाय इतर कोणी वारस नाहीत, संपूर्ण मालमत्ता त्यांच्याच मालकीची आहे, अशी खोटी बतावणी करून संगणमताने दि. 26 जून 2020 रोजी युवा उद्योजक श्री नितीनकुमार नंदकिशोर जोशी रा. अकोला यांचेकडून वेळोवेळी 1 कोटी रक्कम स्विकारून त्यांचेकडून काही प्लॉट मोबदला स्वरूप घेऊन मालमत्ता विक्रीचा करारनामा केला. त्याची नोटरीकडे नोंदणी केली. हा व्यवहार या नोटरी कराराद्वारे अस्तित्वात असताना नमुद इसमांनी हीच मालमत्ता तिन वेगवेगळ्या खरेदी खतामार्फत दि. 25 फेब्रुवारी 2022 रोजी श्री महेंद्र नंदकिशोर अग्रवाल यांना विकली. या व्यवहारात सुद्धा दस्त नोंदणी कार्यालयाने वारसदारांचे समंतीपत्र जोडलेले नव्हते. यामुळे श्री नितीन जोशी यांची 1 कोटी रुपयांनी फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.
श्री नितीन जोशी यांनी या व्यवहारात झालेल्या आर्थिक फसवणुकीबाबत प्रथम दि.19 मार्च 2022 रोजी एमआयडीसी पोलिस स्टेशन, अकोला येथे तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र सदरचा व्यवहार हा दिवानी स्वरुपाचा असल्याचे कारण समोर करून पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही. त्यानंतर त्यांनी दि. 28 मार्च 2022 रोजी मा. पोलिस अधीक्षक अकोला यांच्याकडेसुद्धा याबाबत तक्रार नोंदविली. मात्र त्यांनी सुद्धा सदर तक्रारीची दखल न घेतल्याने नाईलाजास्त श्री जोशी यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाचे याप्रकरणी फौ. प्र. स. कलम 156 (3) अन्वये आरोपींवर त्वरीत कारवाई होण्यासंबंधीचा आदेश दि. 20/6/2022 रोजी पारीत केला, व पोलिसांना गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले.
या वादग्रस्त खरेदी खताच्या आधारे श्री महेंद्र नवलकिशोर अग्रवाल यांनी महसूल दप्तरी मालमत्तेची त्यांच्या नावाची नोंद होण्यासाठी मा. तहसिलदार, अकोला यांचेकडे अर्ज केला. सदर अर्जास श्री जोशी यांनी व आरोपींच्या बहिणी सौ. माधुरी आणि सौ. चित्रलेखा यांच्या वारसांनी देखील तिव्र हरकत घेतली असतानाही त्यांचे आक्षेप खारीज करण्यात आले. मा. तहसिलदार अकोला यांनी त्यांच्या हरकतीची योग्य दखल घेतली नाही.
आरोपींनी श्री नितीन जोशी यांची 1 कोटींनी फसवणूक केली. याबाबतच्या त्यांच्या तक्रारीनंतरही महसूल विभाग आणि पोलिसांनी लक्ष न दिल्याने त्यांना शेवटी कोर्टाची पायरी चढावी लागली. आता कोर्टाच्या आदेशानंतर पोलिस याप्रकरणी काय आणि कशी कारवाई करतात, याकडे सामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....