ब्रम्हपुरी तालुक्यात चोरींच्या घटनांमध्ये वाढ होत असून, शहरात भुरट्या चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. ब्रम्हपुरी शहरातील विद्यानगर येथील प्रसिद्ध असलेल्या साई मंदिर देवस्थानात अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडीत रोख रक्कम लंपास केल्याची घटना दि. ०६ जून बुधवारला सकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार, शहरातील विद्यानगर येथे साई बाबा मंदिर आहे. सदर मंदिरात नेहमीच भक्तांची मंदियाळी असते. त्यामुळे मंदिरामार्फत चालविल्या जाणार्या सत्कार्यासाठी भक्त रोख रक्कम दान करतात. ही रोख रक्कम दानपेटीत जमा केली जाते. घटनेच्या दिवशी दि.०६ जूनला अज्ञात अट्टल चोरट्यांनी साई देवस्थानाचे प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला. तसेच या अट्टल चोरट्यांनी मंदिराच्या गाभार्यात ठेवलेली दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास केली. सकाळी ०५ वाजताच्या सुमारास फिरायला जाणार्या नागरिकांना मंदिराचे प्रवेश द्वार उघडे असल्याचे व चोरी झाल्याचे दिसून येताच, त्यांनी साई मंदिर विश्वस्त मंडळाला या घटनेबद्दल माहिती दिली. मात्र साई मंदिर विश्वस्त मंडळने स्थानिक पोलीस स्टेशनं ला सदर घटनेची तक्रार केलेली नाही शहरात चोरीच्या घटना वाढत असल्याने भुरटे चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शहरातील स्थानिक सुज्ञ नागरिकांनी केली आहे.