सरडपार चक येथून राजोलीकडे जाणाऱ्या दोन व्यक्तींना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. २५) रात्री ६.४५ वाजताच्या सुमारास घडली.मृतकांची नावे दादाजी शिवराम सावसाकडे (वय ६५) आणि उदालक केशव हजारे (वय ५५) अशी आहेत. दोघेही सरडपार चक येथील रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादाजी सावसाकडे आणि उदालक हजारे हे दोघेही सरडपार चक येथून राजोलीकडे काही कामानिमित्त जात होते. तेव्हा विरव्हा बसथांब्याजवळ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाक्याजवळून भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे.