कारंजा (लाड)* : अंगकांतीने,दिव्यदेखणा,शरिर बांधणीने राजबिंडा आणि आधुनिक असा मराठी चित्रपट कलावंत रविन्द्र महाजनी प्रेक्षक रसिकांनी ख-या अर्थाने पाहिला. पाहिल्याक्षणी प्रेमात पडावं,असं त्यांचं प्रभावी व्यक्तिमत्त्व. डौल,देहबोली हे सगळंच आकर्षक आणि अभिनयही उत्कृष्ट असाच असलेला.
त्यांच्या कार्यकाळानंतर त्यांचा तेवढाच देखणा मुलगा गश्मीर पडद्यावर दिसू लागला.रवींद्र महाजनींचा मुलगा शोभावा असाच तोही.
कसलं भारी आणि सुखी कुटुंब होतं!
रवींद्र महाजनी आता कृतार्थ आयुष्य जगत असतील, असं वाटून गेलं.
परंतु काल परवा अपरात्री कळालं की,रवींद्र महाजनी गेले.
दोन-तीन दिवसांपूर्वीच गेले होते.
पण,आज घरात वास आल्यामुळं शेजा-यांना समजलं.
तेव्हा हेही समजलं की, तळेगावजवळच्या आंबी नावाच्या गावात भाड्यानं छोटासा फ्लॅट घेऊन तिथं ते एकटेच राहात होते.
एकटे म्हणजे किती एकटे असावेत?
तीन दिवस त्यांना कोणी फोन केला नसेल? भेटायला कोणी आलं नसेल? कोण्या जवळच्या मित्र-मैत्रिणीला आठवण आली नसेल.पलंगाला खिळून असलेली बायको फोन करणार नव्हती. मुलगा व्यस्त असल्यामुळे कदाचित नेमका या दोन दिवसांत संपर्क झाला नसेलही. पण, बाकी कोणीच असू नये?
प्रसिद्धी,पैसा,पद,प्रतिष्ठा हा सारा भूलभुलैय्या आहे.चक्क थाप आहे.नशा आहे.त्या नशेत आपण सगळं विसरतो.ती नशा उतरते तेव्हा अवतीभवती कोणीच नसतं.ठार एकटे असतो आपण.
म्हणून,
रोजच्या चौकटीतून आणि कुटुंब कल्याणाच्या एकमेव प्रकल्पातूनही जरा बाहेर बघा.
रक्ताच्या नात्याइतकीच बाहेरची माणसंही महत्त्वाची असतात. गोड असतात.
माणसांशी बोला. त्यांच्यावर अकारण प्रेम करा. अडल्या-नडलेल्यांना शक्य असेल तर मदत करा.उगाच भांडणं काढू नका.काढली तरी ती मनात ठेऊ नका.नाहक कोणाचा द्बेष करू नका.फुकाच्या इगोपायी माणसं तोडू नका.आपला गोतावळा तयार करा.माणसांसोबत राहा. माणसात राहा.
रवींद्र महाजनींचं हे असं जाणं खूप त्रास देणारं आहे.
पु.लं.देशपांडे म्हणाले तसं ...
गंधर्व शापितच असायला हवेत का!
- यापूर्वी आघाडीच्या हिंदी चित्रपट अभिनेत्री परविन बॉबी यांचाही मृत्यु असाच जनमाणसाला वेदना देऊन गेला होता.हे तर झालं दिग्गजांच. प्रतिष्ठित सुप्रसिध्द कलावंता करीता तर अख्खा देश, करोडो नागरिक हळहळतातच. रविन्द्र महाजनी यांच्या मृत्युच्या दुःखद निधनाने कारंजेकरही हळहळले. समाजमाध्यमावर भावपूर्ण श्रद्धांजलीचे संदेश सुरु झाले. असो पण यांच्या शिवाय इतरही महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात, तळागाळातील असे, साहित्यीक,नाट्य, लोककला,चित्रपट,पारंपारिक कला,गीत,संगीत, शाहिरी सादर करून,सांजेवर कमवून,उदरनिर्वाह चालविणारे, सर्व जाती धर्माचे,असे परिस्थितीने नाजूक,गोरगरीब कलावंत राहतात की,ज्यांचे तारुण्यात जनजागृती,मनोरंजन यामध्ये फार मोठे योगदान होते. त्यावेळी त्यांचेवर कौतुकाचा आणि बक्षिसाचा भडिमार होत होता.परंतु जेव्हा त्यांचेवर वृद्धापकाळाची गडद छाया पडणे - सुरू होते.तेव्हा ते दुर्धर आजार ग्रस्त होतात.त्यांना ना स्वतःचे घर असते.ना चरितार्थाचे साधन. तेव्हा कलाकाराच्या विविध संघटना,अखिल भारतिय मराठी नाट्य परिषद,कला अकादमी, सांस्कृतिक मंडळ यांनी प्रत्येक कलाकाराकरीता,घराची (निवासाची)-दुर्धर आजाराच्या उपचाराची-वाढत्या महागाई मध्ये उदरनिर्वाह होईल एवढया निवृत्ती वेतनाची मागणी केली पाहीजे.त्यासाठी प्रस्ताव घेऊन, विधानसभेत लक्ष्यवेधी मांडून, महाराष्ट्र शासनाकडून भविष्याची तरतूद करून घेतली पाहीजे. आणि महाराष्ट्र शासनानेही कलाकार हा सुद्धा देशाचा महत्वपूर्ण घटक आहे हे समजून घेऊन त्यांचा वृद्धापकाळ सुखाचा जाईल. व त्याच्या अंत्यसंस्काराचा खर्च शासन करेल याची तरतूद केली पाहीजे.अशी मागणी विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडाळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....