वाशिम : खर्चाच्या या युगामध्ये प्रसुतीकरीता तसेच ग्रामीण भागांमधुन शहरात जाण्याकरीता गरीब रुग्णांना खर्च करणे त्यांच्या खिशाला परवडणारे नाही.यातच शेतकरी, गरीब कुटुंब व इतर जनतेसाठी प्रशासनाने १०२ रुग्णवाहीका वाशिमजिल्हयामध्ये २०११ पासुन सुरु केलेली आहे. या रुग्णवाहीकेमध्ये प्रसुतीसाठी गरोदर मातेस व एका वर्षापर्यंतच्या बालकांना मोफत वाहन व्यवस्था मिळत आहे. रुग्णाच्या गरज पडल्यास एका शासकीय घरापासुन तर शासकीय रुग्णालयापर्यंत व रुग्णालयापासुन दुस-या शासकीय रुग्णालयापर्यंत तसेच प्रसुती झाल्यानंतर नवजात बालकासमवेत घरापर्यंत १०२ रुग्णवाहीका सेवा देते.
वाशिम जिल्हयामध्ये टोल फ्री क्रमांक १०२ च्या एकुण ४१ रुग्णवाहीका उपलब्ध असुन सदर रुग्णवाहीका प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व जिल्हा स्त्रि रुग्णालय येथे सेवा देतात.आजपर्यंत या रुग्णवाहीकांमधुन हजारो गरोदर मातांना व बालकांना मोफत रुग्णवाहीका सेवा देण्यात आली. तसेच यापुढेही अशीच मोफत सेवा देण्यात येईल.या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.अनिल कावरखे यांनी केले आहे.