कारंजा : आपण आपल्या घरात सुखा समाधानाने राहतो याचे सर्वस्वी श्रेय हे आपल्या संरक्षणार्थ राब राब राबणाऱ्या पोलिसाला दिले पाहीजे. पोलिस म्हटले म्हणजे चोवीस तासाची ड्युटी. पोलिसाला स्वतःच्या आरोग्याकडे आणि कुटूंबीयांकडे लक्ष्य द्यायला सुद्धा वेळ मिळत नसतो. परंतु आपले कर्तव्य चोखपणे बजावणार्या कारंजा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक आधारसिंह सोनोने यांच्या सोबत बातचित करण्याचा सहज योग आला. आणि पो.नि.सोनोने यांनी कारंजा येथील दारुबंदी व्यसनमुक्तीचे कारंजा येथील प्रचारक व्यसनमुक्ती पुरस्कारप्राप्त दिलीप गिलडा तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाचे दारूबंदी व्यसन मुक्ती प्रचारक महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संजय म. कडोळे यांचेशी आपल्या दररोजच्या ताणतणावातून मुक्त होत-व्यस्त कामातून वेळ काढीत, व्यसनमुक्ती या विषयावर मनसोक्त चर्चा केली. यावेळी पो नि सोनोने यांनी आपल्या दिनचर्ये बद्दल बोलतांना सांगीतले की, "मी पूर्णपणे निसर्गाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत आहे . सकाळी व्यायाम आणि योगा, सकाळ-सायंकाळ गाईचे दूध, सकाळी लवकर व सायंकाळी सुर्यास्तापूर्वी साधे सात्विक भोजन घेतो. आणि चोवीस तास कर्तव्यावर हजर रहातो . मला व्यसनाची आणि व्यसन करणार्या व्यसनाधिन व्यक्तिची चिड असून हॉटेलचे नास्ता किंवा जेवण मी घेतच नाही." यावेळी दिलीपजी गिलडा आणि संजय कडोळे हे करीत असलेल्या दारुबंदी व व्यसनमुक्ती समाजप्रबोधन कार्यक्रमाबद्दल पो. नि. आधारसिंह सोनोने यांनी त्यांचे अभिनंदन केले. आणि व्यसनमुक्ती कार्यक्रमाबाबत मार्गदर्शनही केले. त्यावेळी त्यांचे आभार व्यक्त करतांना आपल्या मनोगतातून संजय कडोळे यांनी सांगीतले की, "मित्रमंडळीच्या चुकीच्या सहवासातून किंवा एखाद्या वाईट घटनेने माणूस व्यसनाच्या आहारी जात असतो. त्याला मी स्वतः सुद्धा अपवाद नव्हतो. परंतु व्यसनाधिन झाल्यानंतरही मी स्वतःला व्यसनातून सावरले. आणि नुसताच सावरले नाही तर माझ्या गोंधळ जागरण लोककलेच्या कार्यक्रमातून आणि सामाजिक कार्यातून व्यसनमुक्ती प्रबोधन सुरु केले. कित्येकांना व्यसनातून मुक्तही केले आणि त्याची दखल घेऊन, महाराष्ट्र शासनाने मला राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्कार देवून गौरवांकित सुद्धा केले आहे. आता मी आजिवन दारुबंदी आणि व्यसनमुक्तिचे कार्य करणार आहे. आपण आम्हाला आमच्या प्रबोधना करीता काही महत्वाच्या टिप्स दिल्या त्या आम्हाला प्रबोधना करीता उपयोगी पडणार आहेत. त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार ." असा संवाद झाल्याचे वृत्त संजय कडोळे यांनी कळविले आहे.