रामायण हे आयुष्य कसे जगावे, याबाबत मोलाचे मार्गदर्शन करणारे महाकाव्य आहे. मूळ रामायण वाल्मिक ऋषी यांनी लिहिले. श्रीविष्णूचा अवतार असलेल्या रामाला एक बहिणही होती, याबद्दल कुणाला माहिती नाही. अयोध्येचा राजा दशरथाला चार पुत्र होते. श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. मात्र दशरथाला एक मुलगी होती आणि ती या भावंडामध्ये सर्वात मोठी होती. तिचे नांव शांता होते. अंग देशाचा राजा रोमपद व त्याची पत्नी अयोध्येत आले तेव्हा दशरथाला अपत्य नाही म्हणून आपली मुलगी शांता त्यांना दत्तक म्हणून दिली होती. हिमाचल प्रदेशमधील कुल्लूजवळ शांता देवीचे मंदिर आहे. ही शांतादेवी श्रीरामाची बहिण असल्याचे सांगितले जाते.
श्रीरामाकडून मुलगा कसा असावा ते शिकण्यासारखे आहे. श्रीराम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम चरित्रवान व्यक्तीमत्व असलेला महान राजा होय. श्रीरामाने त्यांच्या पूर्ण आयुष्यात नेहमी मर्यादाचे पालन केले. आई, वडिल, भाऊ, परस्त्री यांना मान दिला. कोणी कितीही वाईट असले तरी त्यांच्याशी सम्मानाने वागले. श्रीराम हे पुराणातील देव असतील तरी आजही प्रत्येक गांवागावांत त्यांचे जीवन चरित्र उद्बोधक आणि प्रेरक आहे. श्रीरामाचे चरित्रातून आपण बोध घेणे म्हणजे एक आदर्श जीवन जगणे होय.
श्रीरामाचे राजवाड्यातील चार भिंतीत दडलेले बालपण तसे फार लोकांपर्यंत पोहोचले नाही. रामाचा चंद्र मागण्याचा हट्ट कौसल्या मातेने आरसा दाखवून पूर्ण केला, त्यावरुन रामाचा साधेपणा लक्षात येतो. श्रीराम अयोध्येचे युवराज असून, जेष्ठ पुत्र म्हणून राज्यावर बसण्याचा अधिकार त्यांचा होता पण कैकयीच्या डावपेचामुळे राम, सीता आणि लक्ष्मण यांना १४ वर्षाचा वनवास पत्करावा लागला. यावरुन पितृ आज्ञा, त्याग याची शिकवण मिळते. ज्या सीतेच्या विरहाने व्याकुळ झालेले श्रीराम वनामध्ये फिरत अक्षरशः रडत होते. त्याच सीतेच्या शुद्ध चारित्र्य सिद्ध करण्यासाठी चक्क अग्निपरिक्षा घेण्यास भाग पाडतात. श्रीरामांनी लोक भावनेचा आदर केला.
वालीने अधर्माने सुग्रीवाच्या पत्नीला आपल्या ताब्यात ठेवले म्हणून रामांनी स्त्री रक्षणासाठी वाली-सुग्रीवाच्या युद्धात लपून बाण मारला. लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले ही रामाची संमती होती. ती कपट बुद्धीने आली. श्रीरामाने कुटनीतीला थारा दिला नाही. रावण तपस्वी असून पण तो अहंकाराने बेधुंद झालेला होता म्हणून रामाला त्याचा वध करावा लागला.
श्रीरामाकडून स्थितप्रज्ञता, त्याग, आदर, बंधुप्रेम, आज्ञाधारकता तसेच संकटाला सामोरे गेले पाहिजे, हीच त्यांची आदर्श जीवन जगण्याची कला आपण शिकली पाहिजे, आत्मसात केली पाहिजे. श्रीरामाप्रमाणे एक पत्नीव्रती राहणे शिकले पाहिजे. श्रीराम लोकांवर नेहमी दयाळू आणि नम्र होता. आपण श्रीरामाचे गुण अंगीकारले पाहिजे. श्रीरामासारखे आदर्श जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
रामा तुझे कोमल नाम घेता ।
संतोष वाटे बहू फार चित्ता ।
बापा दयाळा मज भेट द्यावी ।
दारिद्र चिंता अवघी हरावी ।।
लेखक-
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्रीगुरुदेव सेवा मंडळ प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....