सेवेने म्हणजे निष्काम कर्म योगाने आत्मशक्ती वाढते व जे जे बोलाल ते सहज घडून येते. त्याचे सर्व काम हातोहात लोक करतात. एकदा लोकांचा आपल्यावर विश्वास बसला की, आपली सेवा भगवंताला मान्य झाली असे समजावे. जो इच्छा करील ते त्याच्या जवळ येऊन पडेल, मग त्याला कशाची कमी राहणार?
सेवेनी अंगी सामर्थ्य येते ।
जे जे बोलाल तेचि घडते ।
हस्ते, परहस्ते सर्वचि होते ।
काम त्याचे ।। ग्रामगीता
सेवा करणारा नेहमी सत्य बोलतो आणि सत्यानेच वागतो, त्याचे अंगात गुरुत्वाकर्षण येते. गुरुत्वाकर्षण म्हणजे जसा चेंडू वर फेकल्यावर पृथ्वीवर आकर्षित होते, तसेच जो इमानदारीने सेवा करतो त्याच्याकडे गावातील जनमाणूस आकर्षित होतो. मग त्याचेच शुद्ध जीवनाचे सामर्थ्य चालते. त्याकरिता मन सुद्धा शुद्ध असावे लागते. अशाच मित्राची संगत करावी असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात.
मित्रा ! कर मैत्री त्याची ।
जो सत्यावीण शब्द न बोले ।
सहजहि कोणासी ।।
जगतांना सेवकाच्या अंगी आचरण चांगलं नसेल तर त्याच्या शब्दांना किंमत कशी लाभणार? त्याच्यापासून दुसरे काय धडा घेणार? सेवकाला प्रतिष्ठा कशी लाभणार? आपल्या जगण्याचा आदर वाढणे गरजेचे आहे. अर्थात- चांगल्या आचरणाचा प्रभाव असतो, आदर असतो. त्याचा इतरांवर परिणाम होऊ शकतो, त्यातूनच बदल घडतो आणि सुधार होतो.
ज्याने सत्याशी नाते जोडले ।
त्याचे अंगी गुरुत्वाकर्षण आले ।
सांगण्याहुनिही सामर्थ्य चाले ।
त्याच्या शुद्ध जीवनाचे ।।
जो सेवक सत्य मार्गाने, विवेक बुद्धीने वागतो. दुसऱ्याचे हितास्तव जगतो. तो कुणाचेही शोषण, पतन करत नाही, तो सेवक धन्य होय. सेवकाचे कपडे स्वच्छ असो वा नसो पण मन स्वच्छ असलं पाहिजे कारण स्वच्छ कपड्याची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो. सेवकाने सुंदर दिसणे महत्त्वाचे नाहीतर त्याचे कार्य जनतेसाठी असायला हवे.
तूने सेवाही न किया है ।
सुंदर दिखता है तो क्या है ।।
वंदनिय महाराज खालील भजनातून सेवा कार्य करणारा सेवक हा कसा असावा ते सांगतात. तो सरळ हृदयाच असून, त्याच्यावर सर्वजण लोभ करणारा असावा. तो नम्रपणे सेवेकरिता तयार असून त्याला कोणताही मोह नसावा. आपलेच लोक आहे हे समजून सर्वांवर प्रेम करणारा सेवक हवा.
हृदयाचा जो सरळ असे,
त्यावर सगळे लोभ करी ।
नम्र सदा सेवेला तत्पर,
मोह न ज्या असला कसला ।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, मी एक प्रचारक, सेवक पाहिला. गावातील लोकांनी आवाज दिल्या बरोबर तो समोर आला आणि म्हणाला. मी एक सेवक आहे आणि सेवा करणे हे माझे काम आहे. त्याला पाहून मला आश्चर्य वाटले की, एका साध्यासुध्या सेवकाने गाव सुंदर बनविण्याकरिता, घरोघरी शिस्त लावण्याकरिता, गावात शांतता प्रस्थापित करण्याकरिता, गावचे व्यसन दूर करण्याकरिता आपली सेवा देऊन हे मोलाचे कार्य केले. तो दिसायला साधा भोळा असला तरी त्याच्या हृदयात सेवा कार्याचा जिव्हाळा आहे, त्याच्या सेवावृत्तीने तो सर्वास हवाहवासा वाटतो. गावात कार्य करताना सुद्धा गावाला आपल्या सेवेने मोहीत करतो. खरचं सेवेनी अंगी सामर्थ्य येते.
सेवा करणाऱ्याने आपल्या कार्याचा संकल्प पुढे मांडला तरी लोक तो कृतीत आणण्यास धडपडतात व सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे घडून येते. सेवा करणे म्हणजे सुख-चैन भोगणे नव्हे. सेवा करणाऱ्याच्या मनात उपभोगाची वासना निर्माण झाली. त्याची सेवाच संपली म्हणावी. लोक निंदा करु लागतील तरीपण जो निस्वार्थ पणे सेवा करतो, सेवा हीच संपत्ती समजतो. तो देव तुल्य आहे. त्याची घरोघरी लोक पूजा करतात
परि जो सेवाचि मानतो धन ।
काही अपेक्षा न ठेवोन ।
तो झाला शेवटी भगवान ।
पुजू लागले घरोघरी ।।
एकदा लोकांचा आपल्यावर विश्वास बसला की, आपली सेवा भगवंताला मान्य झाली असे समजावे. मग तो इच्छा करील ते त्याच्या जवळ येऊन पडेल, त्याला कशाचीही कमी पडणार नाही? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कोणती सेवा श्रेष्ठ समजतात ते बघू या. दान, पुण्यादि कर्मे, तिर्थयात्रा, रानावनात परिभ्रमण जरी केले तरी सुकीर्तीसाठी लोकांची सेवाच करावी लागते. तिर्थात दान करणे, भुकेल्यांना भोजन देणे, यज्ञानिमित्त अन्न, धन दान करणे, यात सेवा होते म्हणूनच पुण्यसंग्रह सांगितला. एरव्ही हीच सेवा श्रेष्ठ आहे म्हणून सांगितले. पुढे महाराज म्हणतात, ज्यास आवश्यकता आहे त्यास न देता, तिर्थस्थानात जाऊन धनधान्य वाटून देणे याने लोकसेवेचे पुण्य लाभणार नाही. आपुले गावच तीर्थ समजून गावातील दीन दुबळ्यांना अन्न, धनधान्य दान करा. काशीच्या गंगेची कावड रामेश्वराला नेतांना तहानलेल्या गाढवास पाणी पाजून संत एकनाथांनी त्यातच कोटी पुण्य असल्याचे सिद्ध करून दाखविले. सेवेनेच ग्रामपूजन घडते. सेवा हीच खरी धन संपत्ती आहे.
सेवा हीच धन, संपत्ती खरी ।
न सरे जन्मजन्मांतरी ।
वाढवी विश्वाभिमान अंतरी ।
ग्राम-पूजन सेवामय ।।
अवघे विश्वची माझे घर ही दिव्य भावना हृदयात जागृत होते. अशी निष्काम सेवा कराल तरच तुम्ही स्वतः तर उद्धरुन जालचं पण आपल्या बरोबर आपल्या गावाचही सर्व दृष्टीने उद्धार करुन सोडावा. सेवा करण्यास सगळेच तयार असतात. या दुनियेचा व्यवहार सेवेमुळेच चालतो, पण कुठे कोणती सेवा केली पाहिजे हे महत्त्वाचे आहे. एका व्यक्तीने गावाला लूटून अतोनात पैसा जमा केला, मग कीर्तीसाठी देऊळ बांधले. अशाने त्याचे नाव उदार म्हणून गाजले. तो कष्ट न करता चोरी करून धनवान झाला, देऊळ बांधून दानशूर ठरला आणि बिचारे गावातील गरीब तसाच मेला. कष्ट करुनही त्याचे महत्त्व कुणाला कळले नाही. आदर्श सेवकाने निष्काम सेवा व्रत घ्या. आत्मसेवा म्हणजे आपल्या इंद्रियाचे लाड पुरविणे नव्हे तर ती सेवा म्हणजे शुद्ध ब्रम्हतत्वाचे ज्ञान करून घेणे होय. सत्संगाने आत्मज्ञानाचा मार्ग दाखवून सर्व गावी उन्नती साधता येते. सर्वात जनसेवाच श्रेष्ठ समजली जाते. सेवा करताना हृदयात जिव्हाळा हवा तरच त्यात यश मिळते.
लेखक:-
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....