वाशिम : भ्रष्टाचारा विरुद्ध लढा देणारे वाशिम येथील श्रमिक पत्रकार नितीन मुकुंदराव पगार यांचे आज दि. 20 मे 2025 रोजी पहाटे दुःखद निधन झाले आहे.
वाशिम शहरातील रहिवासी असलेल्या नितीन पगार यांचे वाशिम जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रात मोठे नाव आहे.
त्यांनी विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून निर्भीड पत्रकारिता केली आहे. श्रमीक पत्रकार म्हणून ते ओळखले जायचे. ते उत्तम कलावंत होते. त्यांच्या दिग्दर्शनात विविध नाटके, एकपात्री प्रयोग तथा एकांकिका झाल्यात. 'ऑपेरेशन दगड' ही त्यांची गाजलेली नाटिका होती.त्यांचा पत्रकारिता क्षेत्रात,कला क्षेत्रात तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठा चाहता वर्ग होता.त्यांच्या या आकस्मिक निधनाने सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर दिनांक 20 मे रोजी सकाळी दहा वाजता मोक्षधाम वाशिम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर वाशिम येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.मात्र, उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनामुळे पगार कुटुंबासह जिल्ह्यातील संपूर्ण पत्रकारिता जगतावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पश्चात वडील,पत्नी,एक मुलगा,भाऊ,तीन बहिणी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ परिवार,साप्ताहिक करंजमहात्म्य परिवार पगार कुटूंबियाच्या दुःखात सहभागी आहे.त्यांच्या मृत्युने आम्ही चांगला मित्र गमविल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी म्हटले असून, स्व. नितीन पगार यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे.