वाशिम : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सन २०२४-२५ या सत्रापासुन कार्यान्वीत करण्यात आलेली असुन सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायीक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यास
क्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या, आदिवासी विकास विभागाच्या, सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधीत शैक्षणिक संस्थेच्या वसतीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा. अशा इतर मागास वर्ग,विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता, निवास भत्ता व निर्वाह भत्ता या विद्याथ्र्यांना स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत विद्यार्थ्यांचे आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरु केलेली आहे. सदर योजनेच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत. सविस्तर अटी व शर्ती बाबतचे शासन निर्णय दिनांक ११ मार्च २०२४ शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असुन त्याचा संगणक सांकेतांक २०२४०३१११५३४४५३८३४ असा आहे.
अटी व शर्ती:-
विद्यार्थी वसतीगृह प्रवेशास पात्र असावा.
विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला. ( इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग), विद्यार्थी अनाथ असल्यास महिला व बाल कल्याण विभागाकडील सक्षम प्राधिकाऱ्याचे अनाथ प्रमाणपत्र, विद्यार्थी दिव्यांग असल्यास जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे ४० टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांचे पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाख पेक्षा जास्त नसावे.विद्यार्थ्यांचे स्वतःचा आधार क्रमांक आपले राष्ट्रियकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहिल. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या/तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा.विद्यार्थी इयत्ता १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. विद्यार्थ्याना सदर योजनेसाठी अर्ज करतांना किमान ६० टक्के गुण व दिव्यांगास ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे.सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय ३० वर्षापेक्षा अधिक नसावे. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा. भाडयाने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवाशी नसल्याचे प्रतिज्ञापत्र (नोटरी),स्वयंघोषनापत्र(दिलेली माहिती खरी व अचुक असल्याबाबत), कोणत्याही शासकीय वसतीगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र असणे आवश्यक आहे.असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.