आमच्या न्यायव्यवस्थेमध्ये आरोपींना आपली बाजू आणि प्रत्यदर्शी साक्षीदारांना घटनेची साक्ष देतांना ईश्वराची कींवा अल्लाची शपथ देऊन नंतर बाजू मांडण्याची संधी दिली जाते.कारण ईश्वरी शक्ती ही सर्वोच्च आहे आणि तिच्याशी भावनिक प्रामाणिकता म्हणा किंवा तिला साक्ष ठेऊन खोटं बोलणं आणि अनैतिक वागणं प्रामाणिक माणूसच काय गुन्हेगारही करू शकणार नाही,असा आतापर्यंत समज होता.परंतू या देशातील काही घटनात्मक संकेत आणि कायदे कालाबाह्य झाल्याचे जसे अनुभवास येत आहे त्याचप्रमाणे सर्वशक्तिमान ईश्वरी शक्तीशी सुध्दा लबाडी करतांना माणसाना किंवा गुन्हेगारांना आज कसलेही भय राहिलेले नाही. ईश्वरी शक्तीचा प्रभावच मानल्या जात नाही,त्यामुळे मानवतेला आणि नैतिकतेला पराजित करून अमानवता व अनैतिकता येथे थैमान घालत आहे.अशा बदलललेल्या अराजकतेच्या काळात लोकशाही सुध्दा धोक्यात आली असून संविधानालाही आव्हान दिले जात आहे.
अशाप्रकारे कशाला काहीच न मानणाऱ्या सभ्यता आणि जीवनमुल्ल्यांना फारकत देणाऱ्या असंस्कृत समुहातील लोकप्रतिनिधी राज्याच्या आणि केन्द्राच्या राजकीय पटलावरील उन्मादी व्यक्तिमत्वं म्हणून समोर येत आहेत. "प्रतिस्पर्ध्यांच्या जीभा छाटा आणि जीभांना चटके द्या" म्हणून आवाहनातून पेटवणाऱ्या अशा नेत्यांनी नैतिकता आणि सभ्यतेची पातळी ओलांडली असेच म्हणावे लागेल. सभागृहात संविधानिक शिस्त,गोपनियता,सामाजिक सद्भाव आणि नैतिकतेच्या चौकटीला बांधिल राहून शपथा घ्यायच्या आणि वागणे मात्र विपरीत..! म्हणजे ईश्वरी सत्त्य आणि समाजाच्या भावनांशी अप्रामाणिकतेने केलेली घोर प्रतारणाच नाही काय?
भाजपचे वाचाळवीर हे अनेक वर्षापासून कुप्रसिध्द आहेत.परंतू त्यामध्ये आता त्यांचेसोबत युती सरकारमध्ये सहभागी झालेल्या मित्रपक्षांच्या नेत्यांनीही आघाडी घेतली आहे.शिंदेसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी खासदार राहूल गांधी यांची जीभ कापून आणणाराला ११ लाखांचे बक्षिस जाहिर केले.तर त्यांच्यापाठोपाठ भाजपचे राज्यसभा सदस्य अमरावतीच्या अनिल बोंडे यांनी त्यांच्या जीभेला चटके देण्याचे फर्मान सोडले.म्हणजे या महाराष्ट्रात कायद्यांचे राज्य आहे की युती सरकारमधील गुन्हेगारी आवाहनं आणि उन्मादी फर्मानं सोडणाऱ्या बेजबाबदार नेत्यांचे?भाजपचे सत्त्येमध्ये झालेला प्रवेश आणि संविधानिक वाटचालीतून तोडाफोडी करत मिळत गेलेल्या यशामुळे मनोबल वाढत गेले.अनैतिक ऐश्वर्य आणि अधिकारांच्या लालसेतून सत्तेच्या मलिद्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करणारांची संख्या वाढली.अनेकांना राजकीय पदांच्या लॉटऱ्या लागत गेल्याने अहंकार आणि उन्माद पराकोटीच्या गतीने वाढत गेला.त्यामुळे लोकप्रियता मिळवून आपले व्यक्तिमत्व आक्रमक म्हणून सिध्द करीत भाजच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठांना खूश करण्याठी अविचारी वाचाळतेचे फड मोठ्या प्रमाणात निर्माण होत गेले.
सध्या गरळ ओकणाऱ्या लोकप्रतिनिधींवर प्रथमदर्शनी गुन्हे तर दाखल झालेच,परंतू याचं पूढे काय होणार हे सांगण्यास गेल्या अनेक वर्षात भविष्यवेत्त्यांची गरजच राहिली नाही.कारण अनेक घोटाळेबाजांना भाजपच्या बिघडलेल्या प्रवाहात आणून डूबकी देणे,आणि पावन झाल्याच्या घोषणा करून क्लिन चिट देण्याचे करिश्मे आता सर्वसामान्न्यांनाही परिचित झालेले आहेत. लबाडांना आपल्यात सामावून घेणारी गंगा म्हणजे भाजप हा त्यांचा सिध्द परिचय आहे. सुपरपावर पाठीशी आहे आणि प्रशासनही दिमतीला आहे.त्यामुळे आपण कसेही नाचलो तरी कारवायातून पुढे येणारे परिनामही शुण्यच असणार. मग कोणाच्याही जीभा छाटणे,चटके देणे किंवा विरोधकच संपविणे हे आपल्यासाठी कठीण नाही. हा अशा लोकांचा दृढ झालेला समज आहे.युती सरकारातीमधील नेत्यांचे हेच विनाशी धाडस निरोगी समाजव्यवस्थेला आणि लोकशाहीला धक्के देऊन संविधानाला आव्हान देणारे धोकादायक ठरत आहे.या बेताल आदर्शाचे परिनाम समाजावर आणि सक्रिय गुन्हेगारांवर होत आहेत. त्यातून असे पॉवरबाज नेते जवळ असले तर काही पण करता येईल असे त्यांचेही फाजील आत्मविश्वास वाढण्याचे धोके न टाळता येण्यासारखे आहेत.अशा नेत्यांभोवती गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समर्थकांची गर्दी वाढत जाते.मग आपले नेते आपले अभिमान म्हणून "आगे बढो" च्या घोषणा दिल्या जातात. अशा फौजा लोकशाही आणि मानवतेच्या मुळावर आघात करण्यासाठी सतत धावत असतात.
बरं ज्या कारणावरून हे नेते फुकटची प्रसिध्दी आणि लोकप्रियता मिळवण्याचा खटाटोप करीत आहेत त्या राहूल गांधींनी असं काय वक्तव्य केलं? देशातील जातियवाद ज्यादिवशी संपेल त्यादिवशी आरक्षण काढून ते आर्थिक निकषांवर दिलं जाईल हेच ना? यात चुकीचं असं काय आहे? जाती जातीमधील भांडणं थांबवण्यासाठी आणि खऱ्या गरीबांनाच लाभ मिळावा यासाठी आर्थिक निकषांवरच आरक्षण द्यावे असं मत माजी मुख्यमंत्री स्व.विलास देशमुखांनी व्यासपिठावरून मांडलं होतं.त्या शब्दांना, त्या धाडसाला नैतिकता आणि प्रामाणिकतेचं वजन होतं.परंतू "आम्ही आरक्षण मिळवून देतो,तुमचं आरक्षण संपविण्याची कुणाची ताकद आहे?" असं बोलणारे चॉकलेटी नेते मतांची भिक मिळवण्यासाठी हे लबाडीचे उपद्व्याप करीत राहतात.विरोधकांना बदनाम करून,शिवीगाळीची चिखलफेक करीत जाती- जातींमध्ये भांडणं लाऊन समाजाला फसवत राहतात.
विधानसभा किंवा विधानपरिषद सदस्य म्हणून आमदारकीच्या शपथा घेतांना नैतिक आदर्श,जीवनमुल्ल्यांचे पालन, तथा संविधानिक मर्यादांना बांधिल राहून शपथा घेतल्या जातात.परंतू त्या वचनांशी पुढे प्रतारणाच होत जाते.कालांतराने आरक्षण पुढे बंद केलं जाईल हे बाबासाहेब आंबेडकर सुध्दा बोलले होते.राजरत्न आंबेडकर यांनी सुध्दा राहूल गांधी काहीही अनुचित बोललेले नाहीत.त्यामुळे त्यांच्यावरूध्द विनाकारण रान पेटवण्याचं काहीच कारण नाही असं स्पष्टीकरण दिलेले आहे.परंतू समाजाची माथी फडकवून फक्त स्वत:च्या पोळ्या भाजण्याच्या लबाडीत अग्रेसर असणारे काही नेते ही कामं करीत आहेत. आरक्षण विषय पेटवत ठेवण्यासाठी प्रसिध्दीपिसाट वाचाळवीर म्हणून समोर येत आहेत.त्यामुळे राहूल गांधींचं मोठपण आणि कॉंग्रेसची लोकप्रियता उलट वाढत जाणार आहे.परंतू हे नेते का बोललेत याचाही विचार केला जाणार आहे.कदाचित काहींना मंत्रिपदांची आश्वासनं देऊन त्यांनी भाजपने महामंडळाच्या अध्यक्षपदांवरच बोळवण केलेली आहे.म्हणून भाजपसोबत केलेला हा भरभेदी स्फोट तर नाही ना? अशा उलट चर्चा यामुळे सुरू आहेत.आता घोडा मैदान दुर नाही.शेवटी कोणाला कशाचा आणि काय फरक पडेल आणि कसे परिनाम समोर येणार याचे निष्कर्ष सत्वपरीक्षा पाहणाऱ्या विधानसभा निवडणूकांमधून समोर येणारच आहेत..!
शब्दांकन:-
संजय एम.देशमुख,(निंबेकर) ज्येष्ठ पत्रकार
मोबा. क्र.९८८१३०४५४६
आपल्या प्रतिक्रिया द्या....