वाशिम : श्री नवरात्रोत्सव हा सण महिला मंडळी पुरता मर्यादित राहिलेला नसून,नवरात्रोत्सवात आबाल वृद्ध,स्त्रीपुरुष मोठ्या उत्साहाने सहभाग घेत असतात.हल्ली भाविक भक्तांचा मंदिर आणि देवस्थानाच्या कारभारावर विश्वास राहीलेला नाही.श्रीक्षेत्र तुळजापूर, पंढरपूर सारखी देवस्थानं सरकारच्या अखत्यारीत असून देखील अनेकवेळा मंदिरातील देणग्या,दानपेट्या,दागदागीने यामध्ये प्रचंड घोळ होत आलेला आहे.शिवाय मंदिर देवस्थानाचा कारभार अनेक ठिकाणी खाजगी स्वरूपाचा राहीलेला आहे.
(जगाच्या पाठीवर श्री.संत गजानन महाराज हे एकमेव संस्थान सोडले तर इतर कोणतेही संस्थान आपला कारभार पारदर्शी दाखवीत नाहीत.शेगाव संस्थानचा कारभार मात्र स्वच्छ आणि पारदर्शी असून तेथील देणग्याचा हिशेब लेखाजोखा दररोज दाखवीला जातो.आणि मिळालेल्या दानातून समाजहिताचे उपक्रम राबविले जातात.परंतु इतर संस्थानचा कारभार पारदर्शी आणि समाज हिताचा नसल्याने त्यांनी आपली विश्वासार्हता गमविली आहे.) त्यामुळे हल्ली मातृशक्ति उपासक भाविक भक्तांचा कल सार्वजनिक आणि सामुहिक नवदुर्गोत्सव मंडळाच्या कार्यक्रमावर आहे. त्याचे कारणही तसेच आहे.युवा मंडळी सार्वजनिक नवदुर्गा कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येतात.मंडळाचा कारभार उत्सवा पुरता मर्यादित राहणार असल्यामुळे दानशूर देणगीदाते सुद्धा त्यांना भरभरून दान देतात. ही युवा मंडळी त्या दानाचा सदुपयोग करीत,सार्वजनिक नवदुर्गा मंडळाद्वारे विधायक कार्यक्रम राबविण्यावर भर देतात. मनोरंजनातून प्रबोधन व्हावे म्हणून किर्तन, श्रीमद्भदेवीभागवत, भजनस्पर्धा,शालेय महाविद्यालयिन विद्यार्थ्यांकरीता विविध स्पर्धा,प्रतियोगीता, आरोग्य शिबीरे,रक्तदान शिबीरे, राष्ट्रिय एकात्मतेवरील देखावे, अन्नदान,सामुहिक भोजनावळी असे विविधांगी समाजोपयोगी कार्यक्रम राबवून श्री नवदुर्गोत्सव उत्साह आनंद व पारदर्शी पणाने साजरा करतात. समाजातून मिळालेल्या दानाचा समाजाकरीताच सदुपयोग करतात.उत्सव संपताच थांबतात.व आपल्या ह्या आनंदोत्सवाच्या आठवणींची वर्षभर जपवणूक करून पुढील वर्षाच्या श्रीनवदुर्गा आगमनाची प्रतिक्षा करीत असतात.त्यामुळे श्रध्दाळू भाविक मंडळी मंदिर देवस्थानापेक्षा सार्वजनिक श्री नवदुर्गोत्सव मंडळाच्या कार्यक्रमावर भर देत असून त्यांनाच दान देण्यावर भर देतात, त्यामुळे सार्वजानिक मंडळाच्या प्रामाणिक भक्तीभावामुळे व विश्वासार्हतेमुळे,हल्ली समाजात सार्वजनिक नवदुर्गा मंडळाची संख्या वाढतांनाच दिसत आहे. आणि खरेतर ही पारदर्शी भक्तीची सद्सद्विवेक बुद्धी आहे असेच म्हणावे लागेल.