आजचे श्लोक:-
अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम्।
देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि।।२३।।
अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः।
परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्।।२४।।
एक छानशी गोष्ट सांगतो.एकाच खोप्यात जन्मलेली दोन पोपटाची पिले होती. एका माणसाने ती पिले पकडली आणि काही दिवस वाढवली.नंतर दोन वेगवेगळ्या माणसांना ती विकली.त्यातील एक पिल्लू दारू पिऊन रोज भांडणाऱ्या माणसाने नेले. दुसरे एका कीर्तनकाराने नेले. दोन्ही पिल्लं ज्या वातावरणात गेली, त्या मालकाला अनुसरू लागली.हळूहळू बोलणे शिकू लागली.
काही दिवसांनी दारू पिऊन भांडणाऱ्या माणसाकडचा पोपट शिव्या देऊ लागला तर कीर्तनकाराकडचा पोपट छान पैकी श्लोक आणि काव्य म्हणू लागला.थोडक्यात जो ज्याच्या आश्रयाने गेला,तसा बनला.
आपल्या अवतीभवतीच्या लोकांचे बरेच गुण,सवयी आपल्यात नकळत उतरतात, हे तुम्ही पाहिलं आहे का? बऱ्याचदा अवतीभवतीच्या लोकांचे शब्द, वाक्य,बोलण्याच्या पद्धती आपण नकळत घेतो.हळूहळू विचार पद्धती सुद्धा घेतो.काहीजण अवतीभवतीच्या कुणाच्या तरी व्यक्तिमत्त्वाचे पूर्णतः गुलाम होतात आणि हरवून जातात. मग ज्यांच्या सारखे आपण बनतो,त्यांच्या सारखीच आपली नियती बनायला लागते. म्हणून आपण कोणाला अनुसरतो,हे खूप महत्त्वाचे आहे. छोट्या देवतांच्या मागे लागून छोट्या गोष्टी मिळतात,तर सर्व शक्तिमान परमेश्वराला शरण गेले, की आपण सुद्धा महान बनतो.म्हणून या श्लोकांचा अर्थ असा आहे,की अल्प बुद्धीच्या लोकांना त्याच प्रतीचे फळ मिळते. देवतांना भजणारे देवतांना प्राप्त होतात तर सर्व शक्तिमान अशा मला (श्रीकृष्णाला) भजणारे मला येऊन मिळतात.मी सर्व विश्वव्यापक असा अव्यक्त असूनही मला कमी बुद्धीचे लोक व्यक्त म्हणून मानतात.पण अव्यय,अविनाशी अशा मला खऱ्या अर्थाने ओळखत नाहीत!
तसंही देवाला खरंच ओळखणे शक्य आहे का? त्याला खरंच कुणी डोळ्यांनी पाहणं शक्य आहे का? हे नीट कळलेला होनाजी बाळा नावाचा कवी म्हणूनच आपल्याला विचारतो,
"सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?"
लेखक: श्रीनिवास राघवेंद्र जोशी, कारंजा जि.वाशीम
आपल्या प्रतिक्रिया द्या....