वाशिम : महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग विभागाने दि.२७ जून २०२४ च्या परिपत्रकाप्रमाणे, राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना, केन्द्र शासनाच्या स्वावलंबन पोर्टल वरून ऑनलाईन देण्यात येणारे दिव्यांग प्रमाणपत्र आणि ओळखपत्र म्हणजेच यु.डी.आय.डी. कार्ड असणे बंधनकारक केले असल्याची माहिती महाराष्ट्र दिव्यांग संस्था कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी दिली आहे. पुढे बोलतांना त्यांनी सांगीतले की,यापुढे दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या शैक्षणिक,शासकीय नोकरी,रोजगार ,दिव्यांगाना दिल्या जाणारी साधन सामुग्री किंवा दिव्यांगाना दिले जाणारे मानधन,स्थानिक स्वराज्य संस्थेचा नगरपालिका किंवा ग्रामपंचायतचा ५% दिव्यांगनिधी वा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेण्याकरीता शासन परिपत्रकाप्रमाणे दिव्यांगाचे ऑनलाईन सर्टिफिकेट व यु.डी. आय.डी.कार्ड अत्यावश्यक दस्तऐवज करण्यात आले आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत ऑनलाईन नोंदणी करून घेतली नसलेल्या म्हणजेच यु.डी.आय.डी कार्ड नसलेल्या सर्व प्रकारच्या दिव्यांगानी जवळच्या सेतूकेन्द्रामधून आपल्या दिव्यांगत्वाची ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी व दर आठवड्याच्या बुधवार रोजी वाशिम जिल्हा सामान्य रुग्नालयात होणाऱ्या दिव्यांग तपासणी शिबीराचे दिवशी सकाळी ०८:०० वाजता,वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्नालयाच्या दिव्यांग तपासणी विभागाकडे उपस्थित राहून तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर दिव्यांगाचे ऑनलाईन प्रमाणपत्र व ओळखपत्र यु.डी.आय.डी. कार्ड काढून घ्यावे.असे आवाहन महाराष्ट्र दिव्यांग संस्था कारंजाचे संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे यांनी दिव्यांगांना केले आहे.