वाशिम - २१ जून रोजी होणार्या अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर पतंजली परिवार, आर्ट ऑफ लिविंग, ब्रह्मकुमारी, हिंदवी परिवार, गायत्री परिवार तसेच विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शहरात भव्य योग दिंडीचे आयोजन करण्यात आले.
ही दिंडी २० जून रोजी सकाळी ५ ते ७ या वेळेत पतंजली नित्ययोग ग्राउंड येथे आयोजित योग शिबिराने सुरू झाली. या योग शिबिरामध्ये भारत स्वाभिमान व पतंजलीचे जिल्हा प्रभारी डॉ. भगवंतराव वानखडे यांनी उपस्थित योगाभ्यासींना मार्गदर्शन केले. सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्व योगप्रेमी, कार्यकर्ते, एनसीसी व नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी एकत्र जमले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून योग पदयात्रेची सुरुवात झाली. पदयात्रेचा मार्ग पुढीलप्रमाणे होता. छत्रपती शिवाजी महाराज चौक, बालू चौक, सुभाष चौक, गुरुवार बाजार, जैन चौक, नगरपरिषद चौक, राजनी चौक, मन्नासिंग चौक व शेवटी स्वागत लॉन मंगल कार्यालयात पदयात्रेची सांगता झाली. या ठिकाणी अल्पोपहार घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या उपक्रमात जिल्हा क्रीडा कार्यालय, मॉ गंगा मेमोरियल हॉस्पिटलचा नर्सिंग स्टाफ, एनसीसी विद्यार्थी, पतंजली महिला शाखा व विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे समन्वयक भारत स्वाभिमानचे डॉ. भगवंतराव वानखडे, आर्ट ऑफ लिविंगचे डॉ. हरीश बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली रवि मारशेटवार, उजळे, क्रीडाधिकारी श्री बोंडे, सोनकांबळे तसेच महिला पतंजलीच्या सौ. दीपा वानखडे व अन्य योग शिक्षकांनी अतिशय उत्साहाने संयोजन केले. या योग पदयात्रेमध्ये ५०० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवून योग साधनेचा संदेश सर्वदूर पोहोचवला.