आपलं गाव तीर्थ व्हावं, हे ध्येय साधायचं असेल तर गावातील समविचारी मंडळीचे संघटन बांधणे गरजेचे आहे. संघटन हे ग्रामसुराज्य निर्मितीचे महत्त्वाचे साधन होय. गावात संघटना झाली की, सर्वप्रथम गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना करून सामुदायिक प्रार्थनेला सुरुवात करावी.
आपल्या देशात लोकशाहीची राज्यव्यवस्था आहे परंतु खरा अर्थ कळलेला नाही. आपणांस अनुभव घेता आला नाही. आपल्या गावातील लोकशाही मजबूत होण्यासाठी संपूर्ण गाव स्वावलंबी झाले पाहिजे. गावातील तरुण नवयुवकांनी कर्तव्यदक्ष व्हावे.
ज्याने केले असेल ग्राम उन्नत ।
अथवा समुदायाचे आदर्श काम ।
तोची बोलण्याचा अधिकारी ।
समजतो आम्ही ।।
ही राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेची ओवी आपल्या गावाला तीर्थ बनवू शकते. आपण ग्रामगीता प्रणित ग्रामनिर्माण संकल्प हाती घ्यावा. आजच्या नवयुवकांनी जीवनोपयोगी शिक्षण घेतल्यास व आपली उपजीविका भागवण्यासाठी कुणाला पैसे मागण्याची गरज पडणार नाही. युवकांमध्ये एकतरी कर्मगुण असावा, त्यामुळे पालनपोषणाचा प्रश्न उद्भवणार नाही. आज युवक शिक्षण घेऊन इकडेतिकडे रिकामा फिरतो आहे. पण नोकरी मिळत नसल्यामुळे दुर्बल झालेला दिसून येतो, म्हणून राष्ट्रसंत अशा युवकांना संदेश देतांना म्हणतात.
अरे रिकामा कशाला फिरतं?
तुझं गावचं नाही का तीर्थ?
गावी राहती गरीब उपवासी ।
अन्नसत्र लावितोसी काशी ।
हे दान नव्हे का व्यर्थ ।।
एखादा मुलगा शिक्षण घेऊन गावात येतो, तेव्हा तो गावाची अथवा शेतीची सुधारणा करू शकत नाही. वणवण इकडेतिकडे भटकतो. त्याने आपल्या गावाला तीर्थ, स्वर्ग बनविण्यासाठी आपल्या ज्ञानाचा वापर करून ग्रामसुधारणा केली पाहिजे. त्यामुळे गाव आदर्श निर्माण होईल. गावात राहणारे गरीब उपासी राहतात, त्यांना खायला अन्न नाही आणि काशी व इतर तीर्थावर जाऊन अन्नदान करतो. महाराज म्हणतात, हे दान खरोखरच व्यर्थ आहे. गावातील गोरगरिबांना अन्नदान केले तर पुण्याचे काम होईल ना ! आपले दान कधीच व्यर्थ जाणार नाही सर्व ग्राम सुखी, समृद्ध करण्यासाठी गावातील तरुण तसेच ग्रामनाथ यांनी गोरगरिबांना अन्न - वस्त्र निवारा याची सोय करून सर्व गावातील जनतेला सुखी करावे म्हणजेच गावाचे तीर्थ होईल.
सर्व ग्रामासी सुखी करावे ।
अन्न - वस्त्र - पात्रादि द्यावे ।
परि स्वतः दुःखचि भोगावे ।
भूषण तुझे ग्रामनाथा ।।
आजच्या घडीला गावातील शाळा ओस पडली आहे. शाळेत मुलांची पटसंख्या घसरली आहे. मुलं-मुली इंग्रजी शाळेत शिकायला शहरात जातात. राष्ट्रसंतानी पुढे येणारा काळ जाणला. गावची धर्मशाळा शहरी गेली. अशाने आपल्या जीवनाचा अर्थ कधीच निघणारा नव्हे. एक सांगायचे झाल्यास आपल्या गावातील शाळा आजच्या घडीला सेमी इंग्लिश झाली पाहिजे, असे घडून आणण्यासाठी तरुण युवक आणि गाववासी यांचे सहकार्य अनमोल असेल.
तुझ्या गावाची शाळा ही मोडली ।
धर्मशाळा तू शहरी का जोडली ।
याने निघतो का जीवनात अर्थ ।।
आज गावातील गरीबांची झोपडी उध्वस्त झाली. खेड्यात काम मिळत नसल्यामुळे आपल्या उदर निर्वाहासाठी, कामधंदा मिळावा म्हणून शहराकडे जात आहे. शेतीचे कामाकरिता टॕक्टरव्दारे पेरणी, वखरणे, कापणी करणारी यंत्रसामुग्री अस्तित्वात आहे, त्यामुळे मजुराला काम मिळत नाही. गावातील मंदिरे जीर्णावस्थेत आलीत. गावचा माणूस तीर्थक्षेत्रास जातो. बरेचसे गाव सोडून बाहेर नोकरीचे शोधात जातात. गावात गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक वाढलेत. त्यामुळे सर्वकाही अनर्थ घडेल म्हणून राष्ट्रसंत म्हणतात.
गावी गरिबांची घरटीही मोडली ।
तू तीर्थासी मंदिरे ही जोडली ।
गाव-गुंड करीती अनर्थ ।।
प्रत्येक माणूस हेच परमेश्वराचे देऊळ आहे. माणसाची सेवा हीच ईश्वर पूजा आहे. हाच खरा धर्म आहे. हे आयुष्यभर संत गाडगेबाबांनी सांगितले. वरपांगी, ढोंगी अशा धार्मिक म्हणवून घेणाऱ्या आचरणावर तर्कशुद्ध युक्तीवाद राष्ट्रसंत करतात. अंधश्रद्धायुक्त कर्मकांडाने पूजा, अर्चा करुन धार्मिकतेचा टेंभा मिरविणे त्यांना मान्य नव्हते. ते म्हणतात मंदिरात जाऊन बसण्यापेक्षा गावातील मार्गाचे काटे उचलले तरी चालेल. दुःखीतांना प्रेमाने पाणी पाजावे. यापेक्षा श्रेष्ठ तीर्थस्थान नाही.
मंदिरी बैसोनी नाक दाबावे ।
त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे ।
दुःखितासि प्रेमे पाणी पाजावे ।
हे श्रेष्ठ तीर्थस्थानाहुनि ।।
मानवाच्या सुखाकरिता आपल्या कामाची दिशा ठरविली पाहिजे. आपल्या खेड्याची झालेली दैन्यावस्था पाहवत नाही. गावातील युवकांनी ग्रामपुनर्रचनेचा प्रयत्न केला पाहिजे. आपले गाव सुधारण्यासाठी युवकांनी सेवेचा मार्ग पत्करला तर त्या व्यक्तीच्या नावाची कीर्ती सर्वीकडे होईल. त्याचा उदोउदो होईल. त्याच्या जन्माचे सार्थक होईल.
खरे निष्काम ही ग्रामसेवा ।
झटू सर्व भावे करु स्वर्ग गावा ।।
याप्रमाणे गाव आदर्श, स्वर्ग, तीर्थ करण्याचा सर्वांनी संकल्प करु या. गावाची सेवा करु या.
आपुल्या गावाची सेवा जो करतो ।
तोचि कीर्तीने, मानाने तरतो ।
दास तुकड्य म्हणे होई सार्थ ।।
खरोखरच गाव तीर्थ किंवा स्वर्ग बनवायचे असेल तर खेड्यातील प्रत्येक व्यक्तीने घाम गाळून श्रम वेचून आपला समग्र विकास घडवून आणायला हवा. आपले जीवन, आपले गाव, आपला समाज सर्वोतोपरी समृद्ध करुन सोडावा. हीच खरी तळमळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची होती.
हात फिरे तिथे लक्ष्मी शिरे ।
हे सूत्र ध्यानी ठेवूनी खरे ।
आपले ग्रामचि करावे गोजिरे ।।
शहराहुनि ।।
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....