सॅनिटरी पॅड्सची विल्हेवाट न लावल्याने 23 विद्यार्थिनीला मुख्याध्यापिकेने एक तास बाथरूममध्ये बंद करून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर शहरातील नटराज इंग्लिश स्कूलमध्ये उघडकीस आला आहे.
क्रूरता आणि निष्काळजीपणाच्या या कृत्यामुळे मुलींना बराच त्रास सहन करावा लागला तर काहींची प्रकृती खराब झाली.
चंद्रपूर शहरातील बायपास रोडवरील अष्टभुजा परिसरात असलेल्या नटराज इंग्रजी शाळेत दोन दिवसापूर्वी हा प्रकार घडला. शिक्षा म्हणून सातवी ते दहावीच्या वर्गातील 23 विद्यार्थिनींना शाळेच्या बाथरूममध्ये बंद करून ठेवण्यात आले होते. घटनेची माहिती मुलींनी पालकांना सांगितली. पालकांनी तत्काळ ही माहिती युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांना दिली. माहिती मिळताच जिल्हाप्रमुख सहारे व रोहिणी पाटील यांनी तातडीने शाळेत जावून मुख्याध्यापिका सरकार यांना जाब विचारण्यात आले त्यावेळेस त्यांनी चूक मान्य केली.
या बेजबाबदार वर्तनामुळे शाळेची मान्यता रद्द करून शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी केली आहे. यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे सह रोहिणी पाटील व शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.