लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या मुंबई विचारमंथनमध्ये दिनदर्शिका विमोचन
मुंबई/अकोला-- समाजात अराजकता पसरून परिस्थिती झपाट्याने बदलत आहे.अनैतिकता सर्वश्रेष्ठ ठरत असून काही मुजोर प्रशासकीय अधिकारी आणि गुंड समाजातले हिरो ठरत आहेत. अशा विनाशी प्रवृत्तींना प्रतिसाद दिल्याने समाज आणि पत्रकार हक्कांपासून वंचित राहत असून खोट्या जुमल्यात खोटेच मोठे आणि खरे कृतिशील ते छोटे ठरत आहेत. लोकशाही आणि संविधानाला संपविणाऱ्या या अनिष्ट प्रवाहाविरुद्ध पत्रकार आणि समाजातील सजग लोकांनी आक्रमकपणे एकत्र आवाज उठविला पाहिजे. असे संवेदनशील आवाहन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी मुंबई येथे केले.
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ४ था मासिक विचारमंथन मेळावा, मुंबईत टिळक भवन,प्रभादेवी येथे संपन्न झाला.त्यावेळी अध्यक्षिय मनोगतातून त्यांनी जागृती आणि आक्रमकतेची ही आवश्यकता प्रतिपादित केली.याच सभेत लोकस्वातंत्र्य २०२५ च्या दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले. परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांचे विरूध्द ते ६ महिन्यांपूर्वी बदली झाल्यानंतरही परभणी सोडत नसल्याबाबत लोकस्वातंत्र्यचे तेथील विभागीय पदाधिकारी वाजीदखान पठाण व सहकाऱ्यांनी पत्रव्यवहार आणि उपोषणाची नोटीस दिली होती.त्यांना आता मुख्यमंत्र्यांनी निलंबित केल्याची माहिती सुध्दा संजय देशमुख यांनी दिली.
प्रथम लोकस्वातंत्र्याच्या सामाजिक सेवेचे अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,संत गाडगे बाबा यांना वंदन- अभिवादन करण्यात आले. माजी पंतप्रधान स्व. मनमोहनसिंग व तबला वादक झाकीर हुसेन यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्याप्रमाणे देशातील शहिद जवान,अत्त्याचारातील महिला बळी,आत्महत्त्याग्रस्त शेतकरी,आपत्तीग्रस्त व अपघात बळींना, तथा मराठवाड्यातील सोमनाथ सुर्यवंशी,सरपंच संतोष देशमुख,स्व.विजय वाकोडे यांनाही सामुहिक श्रध्दांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र संघटन प्रमुख अरविंदराव देशमुख, मुंबई प्रदेश संघटक तथा मंत्रालयीन सचिव रफिक मुलानी,नवनियुक्त कोकण प्रभारी व पालघर जिल्हाध्यक्ष जगदिश प्रसाद करोतिया, ठाणे जिल्हा संघटन प्रमुख व नवनियुक्त पत्रकार मुंबई प्रदेश महिला आघाडी प्रमुख सौ.सुषमा ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी अध्यक्षिय मनोगतातून संजय देशमुख यांनी लोकस्वातंत्र्यसोबत थोडी वेगळी, पण समांतर सुरू होणाऱ्या एका सामाजिक,राजकीय प्रवाहाबद्दल माहिती दिली. त्याचप्रमाणे आगामी राष्ट्रीय अधिवेशन,स्मरणिका जाहिराती व ईतर निधीसंकलनासाठी पदाधिकाऱ्यांना आवाहन केले. याप्रसंगी रफिक मुलानी यांनीही वस्तूस्थितीदर्शक मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे जगदिशप्रसाद करोति यांची कोकण प्रभारी म्हणून तर सौ.सुषमा ठाकूर यांची पत्रकार मुंबई प्रदेश महिला आघाडी प्रमुख अतिरीक्त कार्यभाराच्या नियुक्तीची घोषणा संजय देशमुख यांनी यावेळी केली.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र संघटक अमिता कदम, विदर्भ संघटक पंजाबराव देशमुख,ठाणे जिल्हा संघटन प्रमुख संजय सोळंके, उमेश चौधरी व पत्रकार उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन व आभारप्रदर्शन अमिता कदम यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....