ग्रामीण जनसमुहाचा विकास व सुस्थितीतील ग्रामजीवन हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समग्र रचनांचाच पाया आढळतो. ही कविता सामान्य लोकांच्या जवळ घेऊन जाते. राष्ट्रसंत पुरोगामी विचाराचे, जातिभेद व अंधश्रद्धा या विरूद्ध समाजाला जागं करणारे समाज सुधारक होते. ग्रामसुधारणा हाच देश सुधारणेचा पाया आहे असे त्यांचे मत होते. भौतिक संपन्नता आणि सुख यांचा फारसा सबंध नसतो तर ते आपल्या मनोरचनेवर अवलंबून असते. हे राष्ट्रसंत यांचे मत आणि ते पटवून सांगणारी ही रचना आर्थिक सुबत्ता सोयी देऊ शकते पण सुख साधेपणात आहे व त्यातच शांती समाधान मिळते असे त्यांना वाटते.
झोपडी म्हणलं की, आपल्या डोळ्यासमोर येते ती शहरी किंवा ग्रामीण झोपडपट्टी, झोपडपट्टीत असणारे दुःख, दैन्य, दारिद्रय, अस्वच्छता, व्यसनाधीनता म्हणजेच जीवंतपणी नरकवास. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एका कवितेत वर्णन केलेली झोपडी मात्र खूपच आगळी वेगळी आहे. त्यांनी झोपडीचे वर्णन कसे केले ते बघू या.
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली ।
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ।।
सर्व सुख सोयींनी युक्त अशा राजमहालात राजाला जे सुख कदाचित मिळते ते मला मात्र या माझ्या झोपडीत नेहमीच मिळत असते. राजाचा महाल सुद्धा माझ्या झोपडीपुढे फिका आहे. कारण हा राजमहाल भरपूर खर्च करुन बांधला. महालात सुख, समृद्धी जरी असेल, ती माझ्या चंद्रमोळी झोपडीत काहीही खर्च न करता मला मिळाली आहे. महाराजांना त्यांचे झोपडीत कोणते अनुभव मिळत आहे?
भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे ।
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, या माझ्या झोपडीत मोकळ्या आकाशाखाली जमिनीवर आडवं पडून ईश्वराचे लुटलेलं अगाध सौंदर्य भरभरुन न्याहाळता येत आणि मग त्यांच्या नामस्मरणात अपरिचित सुखाचा लाभ होतो. झोपडीतून आकाशात नजर जाईल आणि असंख्य चांदण्या तुमचं मन वेधून घेतील. ते चांदण्याचे आभाळ पाहत असतांना प्रभुचे नाम मुखामध्ये येतं. कारण त्याचीच तर सर्व कृपा आहे. या झोपडीत स्वच्छ हवा, चांदण्याचे आकाश, सूर्यप्रकाश मिळते, ही त्याचीच तर रुपे आहेत. हे सारे आपण अनुभवतो आणि श्वास देखील घेतो.
पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या ।
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ।।
महालात तिजोऱ्यामध्ये धनदौलत साठवून भरलेली असते. त्यामुळे महालावर सक्त पहारा ठेवला जातो. याउलट झोपडीत धनदौलत नसल्यामुळे झोपडीचे दार दोऱ्यांनी, कड्या कुलपांनी बंद करावे लागत नाही. झोपडीला चोराचे भय नाही. झोपडीची दार सदैव उघडी असतात. झोपडीत येणाऱ्यांना व झोपडीतून जाणाऱ्यांना कशाचीही भीती नसते. झोपडीत येणाऱ्या कोणावरही कोणतेही दडपण नसते. महालात चोरी होते पण झोपडीत मुळीच ही भीती नाही. या भौतिक संपत्तीहून मौल्यवान अशी पारमार्थिक संपन्नता माझ्या झोपडीत चिरस्थायी नांदत असते.
जाता तया महाला, मज्जाव शब्द आला ।
भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या ।।
राजमहालात जे चौकीदार, पहारेकरी असतात त्यामुळे अनेक ठिकाणी अनेकांना जाण्यास बंदी असते. कारण तिथल्या सुविधा सहज साध्य नसतात. विशिष्ट लोकांकरिता राखीव असतात. सर्व सामान्यांना तिथे वावरण्याचे भय असते, तसे माझ्या झोपडीत कसलाही मज्जाव अथवा भीती नाही कारण इथलं सुख शाश्वत आहे, ते कशावरही अवलंबून नाही.
महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने ।
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ।।
महालामध्ये अनेक प्रकारच्या सुख सुविधा असतात पण आम्हा सगळ्यांना आहे त्या परिस्थितीत समाधान मिळते असे त्यांना वाटते. महालात सर्वांना झोपायला मऊ बिछाने, मऊ गाद्या, मऊ उश्या डोक्याखाली, पांघरायला उबदार पांघरून असतात. वर छताला झुंबरे असतात. प्रकाशासाठी कंदील, शामदाने असतात. एवढ्या सुख सुविधा असून सुद्धा सुखाच्या झोपेची शाश्वती नसते. माझ्या या झोपडीत जमीन अंथरायला, आभाळ पांघरायला असते. जमिनीला पाठ लागताच शांत सुखाची झोप लागते.
येता तरी सुखे जा, जाता तरी सुखे जा ।
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ।।
येणाऱ्यांचे स्वागत आहे आणि जाणाऱ्यांना बंधन नाही. हे केवळ लोकांच्या नव्हे तर परिस्थितीच्या बाबतही ते म्हणत असावे. कारण त्यांना स्थितप्रज्ञ कृतीपुढे परिस्थितीच्या अनुकूल प्रतीकूलतेचा त्यांच्यावर कसलाही परिणाम होत नाही. हे त्यांना सुचवायचे आहे. माझ्या झोपडीत कुणावर दडपण नाही पण झोपडीत तुम्हाला असे काही वाटणार नाही. माझ्या या झोपडीत प्रत्येकाने कधीही केव्हाही आनंदाने यावे, जावे इथे कुठलचं भय नाही की, अवघडलेपण वाटणार नाही.
पाहून सौख्य माझे, देवेंद्र तो ही लाजे ।
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की, माझ्या झोपडीतली शांती किंवा सौख्य प्रत्यक्ष इंद्राला लाजवेल इतके भरभरुन आहे म्हणजेच स्वर्गातल्या सुखा इतकेच किंवा त्याहूनही आधिक ते शाश्वत आहे कारण ते बाहेरच्या वस्तूंवर अवलंबून नाही तर मनाच्या स्थिरतेवर टिकलेले आहे.
अगदी सोप्या शब्दात तुकडोजी महाराज आपल्या झोपडीचे वर्णन करतात. माणसाचे चित्त समाधानी असेल तर त्याला कोणत्याही भौतिक ऐश्वर्याची गरज नसते. हेच यातून सुचित होते. सुख मिळाले तरी त्यांचे मन भरत नाही आणि सुखाची निद्रा देखील येत नाही. शेतकऱ्यांच्या शेतातील खोपडी अशीच असते. त्या खोपडीत सुद्धा हेच सुख असते. खोपडीसमोर शेत शिवार, पाखरांची चिवचिवाट, मोकळा वारा, काम केल्यावर भूक लागल्यावर अमृताहून गोड अशी भाकरी महालातील पंचपक्वांने यापुढे काहीच नाही. सुखाचे परिणाम आपल्या मनातच असते म्हणूनच महालात सर्व सुखे असून तिथलीच माणसे सुखी असतीलच असे नाही आणि झोपडीत काही नाही म्हणून तिथली माणसं दुःखी असतील असेही नाही.
बोधः- या कवितेत साधी, सर्व सामान्यांना आपलीशी वाटणारी व ग्रामजीवनाशी जवळीक साधणारी कवितेतील भाषा,आहे. भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे या काव्यपक्तीत असलेली कल्पना इतकी मोहक आणि सुखकारक आहे की जणू आपण त्याचा अनुभवच घेतो आहोत. बहुसंख्य लोकांच्या आर्थिक मागासलेपणाच्या दुःखाला सहजपणे बाजूला सारुन शाश्वत सुखाची महती या काव्यात दिसून येते. चिरंतन सुखाचा राजमार्गच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्याला खुला करतात. हा देह एक झोपडीच आहे. या देहाच्या झोपडीत असणारा गढूळपणा, वासनेचा त्याग करु या. या देहाच्या झोपडीत असणाऱ्या आत्मारामाचे ध्यान, चिंतन करुन ही देहाची झोपडी मंदिराप्रमाणे पवित्र बनवू या.
पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....