कारंजा (लाड) : मे महिन्याच्या उत्तरार्धात,अचानक झालेल्या पर्यावरणीय बदलांमुळे, बंगालच्या उपसागरापासून तर अरबी समुद्रापर्यंत आणि आपल्या महाराष्ट्रावर आकाशात प्रचंड कमी दाबाच्या वातावरणीय वादळ वाऱ्यांचा पट्टा तयार झाला असून,आकाशात अवकाळी आणि मोसमी ढगांनी एकच गर्दी केल्याचे दिसून येत आहे.असे सांगतानाच ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी पुढे सांगितले की, राज्याच्या हवामान विभागाच्या आणि जिल्ह्यातील एकमेव हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे पाटील यांच्या अंदाजानुसार,सद्यस्थितीत कोकण किनारपट्टी,मुंबई,पश्चिम महाराष्ट्रासह पूर्व पश्चिम विदर्भाच्या काही भागात चक्रवाता प्रमाणे वादळी वाऱ्यासह धुंवाधार ते रिमझिम पाऊस भाग बदलवून पडत आहे.त्याशिवाय आज शुक्रवार दि २३ मे २०२५ पासून पुढील सात दिवस राज्याच्या काही भागासाठी धोक्याचे असू शकतात. या काळात जिल्हातील वाशिम, रिसोड, मालेगाव,मंगरूळपिर,कारंजा, मानोरा भागापैकी काही ठिकाणी,ढगाच्या गडगडाटानंतर आकाशातून विजा कोसळू शकतात.तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडू शकतो.तर अन्य भागात रिमझिम पाऊस होण्याची शक्यता आहे.या आठवड्यात तापमानात अजिबात वाढ होणार नाही.मात्र उकाडा कायम राहणार आहे. कोकण किनारपट्टी मुंबई भागात प्रचंड वादळी वारे वाहून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल. तर देशपट्टी अमरावती जिल्हा आणि झाडीपट्टी वर्धा,भंडारा, चंद्रपूर,गडचिरोली भागातही पावसाचे प्रमाण जास्तच राहणार असून त्यामुळे हा सावधानीचा इशारा लक्षात घेऊन,स्थानिक स्वराज्य संस्था,नगर पालिका, ग्रामपंचायत,विद्युत विभागाने सतर्क राहून नियोजन करावे. मेंढपाळ,गुराखी,शेतमजूर, प्रवाशी,शेतकऱ्यांनी दुपारपूर्वी शेतातून गावाकडे घराकडे परतावे.विजा कोसळणार असल्याने शेतात,हिरव्या झाडाखाली गुरेढोरे,मेंढ्या बसवू नये.पाऊस येत असल्यास, चुकूनही हिरव्या झाडाचा आश्रय घेऊ नये.शेतात पडणारी विज उंच व जीवंत झाडे,विद्युत खांब आकर्षीत करून घेत असतात.हे लक्षात घ्या.या काळात विद्युत पुरवठा बंद होण्याची शक्यता असल्याने पर्यायी व्यवस्था ठेवावी.विजा कडाडत असतांना, रस्त्यावरील वाहने,आपले मोबाईल फोन बंद ठेवावेत. अचानक नदीनाल्यांना, पांदन रस्ते,गटाराला पूरसदृश्य पाणी आल्यास त्या पुरामधून गुरेढोरे व दुचाकी,चार चाकी, एस टी बस इ.वाहने नेऊ नका.पूरामधुन पोहून जाण्याचे धाडस करू नका.आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तहसिलदार, ठाणेदार,ग्रामविस्तार अधिकारी, तलाठी,विद्युत विभाग व डॉक्टरांचे फोन नंबर जवळ ठेवा. स्वतःची,स्वतःच्या कुटुंबियांची, शेजारच्या नागरिकांची काळजी घ्या.असे आवाहन साप्ताहिक करंजमहात्म्य परिवाराच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवी पत्रकार संजय कडोळे यांनी केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....