आरमोरी.-
प्रचलित व्यवस्थेने माणसाला माणसापासुन दुर ठेवण्याचे काम केले. शोषण, पिळवणूक आणि जगण्याचे समाधान हिरावले. अशा दबलेल्या, पिचलेल्या लोकामध्ये नवी उर्जा ,चेतना पेटवून त्यांच्यात लढण्याचे सामर्थ्य निर्माण करण्यासाठी झुंज दे आता हा काव्यसंग्रह निश्चित भूमिका बजावेल. निर्भय राहून जगावं लागेल,.. संघर्ष अजून संपलेला नाही.. झुंज द्यावीच लागेल .. असे परखड मत गडचिरोली जिल्ह्यातील प्रख्यात समाजसेविका तथा कवियत्री कुसुम आलाम यांनी व्यक्त केले यावेळी त्यानी गडचिरोली सारख्या आदिवासी जिल्ह्यातील कवी नागसेन गोडसे यांनी वास्तविकतेवर आधारित विवीध विषयांना हात घालून कविता संग्रह लिहून त्यांनी कविमनाला नवी दिशा दिली आहे. त्यांच्या कवितासंग्रहाची दखल घेऊन विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश करावा अशी अपेक्षाही त्यानी केली .
सेवानिवृत्त शिक्षक नागसेन गोडसे यांच्या "झुंज दे आता" ,या कवितासंग्रहाचे थाटात प्रकाशन रविवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून कुसुमताई आलाम बोलत होत्या..
प्रकाशन सोहळ्याला शिक्षण महर्षी भाग्यवान खोब्रागडे, डॉ. राजकुमार शेंडे,सामाजिक कार्यकर्ते जयकुमार मेश्राम ,यशवंत जांभुळकर, लक्ष्मी मने, राजू बोरकर ,सुनीता तागवान, संगीता ठलाल , प्रा.प्रदीप चापले, मनोहर सुंदरकर , विजयकुमार ठवरे व कवी नागसेन गोडसे आदी उपस्थित होते.
"झुंज दे आता" हा काव्यसंग्रह संघर्षमय जीवनातील वास्तविक घटनेवर आधारित आहे. भूक,मोर्चा, जय हो, बोनसाई यासारख्या प्रेरणादायी कविता आहेत. कवी नागसेन गोडसे यांनी कवितासंग्रहातून समाजातील विविध समस्यावर प्रखर भाष्य केले आहे. त्यांच्या कविता वाचकांना निश्चितच अंतर्मुख करतील. आणि समाजात नवीन विचार प्रवाह निर्माण होईल असा आशावादही यावेळी उपस्थितानी व्यक्त केला..
नागसेन गोडसे यांच्या कवितांमधून समाजातील संघर्ष व लढण्याची झुंज स्पष्टपणे दिसते. हा संग्रह केवळ वाचण्याचा आनंद देत नाही तर वाचकांना समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देते. असे मत भाग्यवान खोब्रागडे यांनी व्यक्त केले.
प्रा राजकुमार शेंडे यांनी गोडसे यांच्या कवितेमधून एक संवेदनशील व जागरूक कवी समोर आला आहे. कवितेमधून संघर्ष आणि संवेदनाच्या नितळ मांडणीचा अप्रतिम अनुभव मिळतो असे म्हटलें तर सामाजिक कार्यकर्ते जयकुमार मेश्राम यांनी साहित्यातून प्रेरणा मिळाली पाहिजे. आणि समाजामध्ये जी आर्थिक विषमता निर्माण झाली आहे . ती कशी नष्ट करता येईल याविषयी साहित्यिकांनी अर्थकारणावर साहित्य लिहिले पाहिजे . आणि समाजाला नवी दिशा दाखवली पाहिजे असे ते म्हणाले.
कवी नागसेन गोडसे यांनी कविता लिहिण्यामागची भूमिका, जीवनात मिळालेले अनुभव , आणि करावा लागलेला संघर्ष विषद केला.
संचालन केंद्रप्रमुख राजू वडपल्लीवार यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. अमरदीप मेश्राम यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....