वाशिम : आजचा उन्हाळा पहाता,प्रवास करतांना प्रत्येक वाहनधारक सावलीसाठी हिरव्या झाडाचा शोध घेतांना दिसतो. मात्र रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली केलेल्या झाडांच्या कत्तलीमुळे रस्त्यांच्या दुतर्फा असलेली शेपाचशे वर्षापूर्वींची कल्पवृक्ष (वड,पिंपळ, कडूलिंब, औदुंबर) तुम्ही आम्ही नामशेष केलेली आहेत.नव्याने वृक्षारोपणाचा देखावा करून शासनाकडूनही केवळ जनतेच्या करोडो रुपयांचा चुराडा सुरु आहे.दरवर्षी वृक्षारोपन केले जाते परंतु त्याचे संगोपनाकडे खुद्द शासन प्रशासनाचे लक्ष्य नाही. त्यामुळे कित्येक वर्षापासून एकाच ठिकाणी वृक्ष लावण्याचा देखावा केल्या जातो. मात्र त्या ठिकाणी मागील वर्षानुवर्षे लागवड केलेली झाडे जगली का नाहीत ? याचा विचार कुणीही करीत नाही.पर्वत,जंगले नामशेष करून,उद्योग कारखाने व निवासी भूखंड आणि रस्ते महामार्ग तयार केले जात आहेत.त्यामुळे अनेक ठिकाणचे शहरच्या शहर व गावेच्या गावं, वस्त्या वाड्या मोहल्ले, वृक्षहिन झालेले आहेत.त्याचा परिणाम म्हणजेच नैसर्गीक पर्यावरणाचाच ऱ्हास झाल्याने,प्राणवायू ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊन,वातावरणात कमालीचे प्रदुषण वाढून,पृथ्वीवरील ऋतुचक्रावर आणि जीवसृष्टिवरच परिणाम झालेला आहे.गावा जवळील पर्वतराई, जंगल-वृक्ष नष्ट झाल्यामुळे पावसाळ्यात पाऊसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे.आणि उन्हाळ्यात तापमानाचा पारा पन्नाशी गाठू पहातो आहे.वाढत्या तापमानाने उत्पादक शेती नष्ट होत आहे. कधीकाळी जेथे नदी नाले तलाव होते.तेथे उजाड जमिन झाली आहे.किंवा माणसांची निवास स्थाने झाली आहेत.पशुपक्षी यांच्या अनेक जमाती संपुष्टात आलेल्या आहेत.व मानवी जीवाची लाही लाही होऊन उन्हाळ्याच्या प्रखर उकाड्यातून वाचण्यासाठी तो धडपड करीत आहे.ही परिस्थिती दिवसेंदिवस जास्तच कठीण,नव्हे कठिनात कठीण होत जाणार आहे. पृथ्वीवर वृक्षच राहीले नाही तर पुढे नैसर्गिक प्राणवायूच मिळणार नाही.ही अंतिम परिस्थिती येऊन पोहोचली आहे. आजची पिढी तर कसेबसे जीवन जगतच आहे.परंतु त्यांची पुढची पिढी (मुलेबाळे) त्यापुढची पिढी (नातवंडे) जगणे अशक्य होणार आहे.त्यामुळे भविष्यात मानवप्राणी (आपली मुले नातवंडे) जगवायचे असतील. त्यांना जीवनदान द्यायचे असेल तर,त्यांच्यासाठी धनदौलत,सोने नाणे,पैसा अडका,फ्लॅट,प्लॉट (कोरडे भूखंड) याची जमवाजमव न करता,पुढच्या पिढीला आपल्या वंशावळीला जीवनदान देण्यासाठी म्हणून,प्रत्येकाने आपल्या घराशेजारी,बंगल्याच्या परसबागेत,सार्वजनिक मोकळ्या जागेत कल्पवृक्ष (कित्येक पिढ्यांपर्यत शेपाचशे वर्ष जगणारी) वड,पिंपळ,औदुंबर, कडूलिंब,आंबा,बिल्ववृक्ष इत्यांदी लावून त्याचे संगोपनावर भर द्यावा. ज्याप्रमाणे आपण मुलाबाळाचे संगोपन करतो त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त काळजी घेऊन, झाडाचे लालन पोषण करीत संवर्धन करा. प्रत्येकाने आपल्या वाडवडिलांच्या (पितरांच्या) स्मृती प्रित्यर्थ,बाळाच्या जन्मानंतर ती आठवण जपण्यासाठी चिरकाल टिकणारा एकतरी वृक्ष वड,पिंपळ, औदुंबर, कडूलिंब,आंबा, जांभूळ,बेल वृक्ष लावा.आपल्या मालकीच्या भूखंडामध्ये बंगला बांधतांना वृक्षा रोपणासाठी झाडा करीता राखीव जागा ठेवा. झाड लावा.त्याला दररोज भरपूर पाणी देवून वाढवा. घरासाठी घेतलेल्या भूखंडामध्ये योगायोगाने चांगले झाड असेल तर तो भाग सोडून निवासस्थान बांधा.घरामध्ये शोपिस म्हणून प्लॉस्टिकच्या वेली आणि झाडे ठेवून प्रदुषण वाढविण्यापेक्षा घरात जगणारी जीवंत झाडे,वेली लावा.घरात भरपूर प्राणवायू देणारा झरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळशीची जास्तित जास्त रोपे लावून घराला ऑक्सिजन युक्त बनवा.असे आवाहन पर्यावरण प्रेमी समाजसेवक संजय कडोळे यांनी केले आहे.