**
""
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 2010 मध्ये स्थापन केलेल्या या दिवसाचे उद्दिष्ट, डेंग्यूताप,डासामुळे होणारा विषाणूजन्य आजार याबद्दल जागरूकता निर्माण करणे, आणि त्याच्या प्रसाराला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायाना, प्रोत्साहन देणे हे आहे.
म्हणून भारतात दरवर्षी 16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो.
16 मे 2025 चे राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे घोषवाक्य:-
या वर्षाचे घोषवाक्य *"Check,Clean, Cover : Step to Defeat Dengue."* म्हणजेच, "तपासा, स्वच्छ करा आणि झाकून ठेवा : डेंग्यूला हरवण्याचे उपाय करा." हे आहे.
थोडक्यात आपण डेंग्यूताप, एडिस इजिप्ती डासाची ओळख आणि जीवनचक्र, डेंग्यूताप चे प्रकार, लक्षणे, आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना बघुयात.
डेंग्यूताप (Dengue Fever):-
डेंग्यूताप हा आजार डेंग्यू विषाणूमुळे होतो.डेंग्यू विषाणूला अर्बो विषाणू असे सुद्धा म्हणतात. प्रामुख्याने डेंग्यू तापाचा प्रसार एडिस इजिप्ती नावाच्या डासामुळे होतो. हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. स्त्री-पुरुषात सारख्या प्रमाणात होतो. डेंग्यू चा रुग्ण व डेंग्यूच्या विषाणूमुळे संसर्गिक झालेला एडिस इजिप्ती डास यामुळे डेंग्यू तापाचा संसर्ग होत असतो. डेंग्यू तापाचा अधिशयन काळ 5 ते 7 दिवस असतो.
एडिस इजिप्ती डासाची ओळख व जीवनचक्र :-
संशोधन नि प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे 10 दिवसीय हत्तीरोग मूलभूत प्रशिक्षण मी घेतले आहे.आणि त्या प्रशिक्षणात शिकवण्यात आलेल्या एडिस इजिप्ती डासाची ओळख व जीवनचक्र पुढील प्रमाणे मांडण्याचा पर्यन्त करीत आहे.
1)अंडी (Egg):-
डासांची अंडी सूक्ष्म अंदाजे अर्धा मि.ली. लांब असून एका वेळी पाण्याच्या पृष्ठभागावर 100 ते 150 संख्यामध्ये डासांची मादी 5 ते 6 वेळा अंडी घालते. एडिस इजिप्ती डास घरगुती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. अंडी लंबगोल असतात व एकमेकांना चिकटलेले नसतात.
2) अळी (Larva):-
अंड्यामधून 48 तासानंतर अळीचे रूपांतर होते. एडिस इजिप्ती डासांची अळी पाण्याच्या पृष्ठभागावर 90 अंशाचा कोण करतात. या अळ्यांची सायफन ट्यूब जाड व आखूड असते. ही अळी पांढरी असून तिची हालचाल अतिशय जलद असते.
3) कोष (Pupa):-
एडिस इजिप्ती डासांचा कोष स्वल्पविरामच्या आकाराचा असून पाण्यामध्ये सतत पोहत असतो. या अवस्थेमध्ये ते अन्न न घेता दोन ते तीन दिवसानंतर प्रौढ डासांमध्ये रूपांतरित होतात.
4) पूर्ण डास(प्रौढ डास)(Adult):-
एडिस इजिप्ती डास 8 ते 10 दिवसात पूर्ण तयार होतो. एडिस डास लहान आकाराचा काळया रंगाचा व फटट् पांढऱ्या रंगाचा पट्टेदार असतो. डासाच्या थोरॅक्स भागावर चंद्रकार पांढऱ्या रंगाचा स्केल आकार आलेला असतो. पायाच्या दुसऱ्या भागाला पांढरे पट्टे असतात. मागच्या पायाचे शेवटचे टोक पांढरे असतात. धडावर विशिष्ट प्रकारच्या चक्राकार रेघ असलेला आकार असतो. पंखावर ठिपके नसतात. व ते पृष्ठभागावर समांतर बसत असतात. एडिस इजिप्ती हा मादी डास दिवसा मानवाला चावा घेऊन रक्त शोषून घेतो आणि मानवी शरीरात डेंग्यू चे विषाणू सोडत असतो.
अशाप्रकारे एडिस इजिप्ती डास तयार होत असतो आणि वरील प्रकारची सवय व स्वरूप दिसून पडल्यास तो डेंग्यू चा एडिस इजिप्ती डास आहे हे ओळखता येते.
डेंग्यू तापाचे प्रकार:-
डेंग्यू तापाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत.
1) रक्तस्त्राव नसणारा डेंग्यूताप.
2)रक्तस्त्राव असणारा डेंग्यूताप.
डेंग्यू तापाचे लक्षणे:-
रक्तस्त्राव नसणारा डेंग्यूतापाची लक्षणे.:-
1) एकाएकी ताप येणे.2) असह्य डोकेदुखी.3) सर्वांग दुखणे.4) उलट्या होणे.5) लसिका ग्रंथी सुजणे.6) अंगावर पुरळ येणे. इत्यादी.
रक्तस्त्राव असणारा डेंग्यूतापाची लक्षणे.
वरील प्रकारचे सर्व लक्षणे या प्रकारात सुद्धा असतात. त्याशिवाय, 1) पोटात दुखणे.2) त्वचा पांढुरकी व थंड पडणे.3) नाकातून,तोंडातून, हिरड्यातून रक्तस्त्राव होणे.4) खूप तहान लागणे.5) झोप न येणे.6) चक्कर येणे. 7)शश्वासोच्छ्वासास त्रास होणे.8)नाडी जोरात चालणे. इत्यादी.
वरील प्रकारचे लक्षण आढळून आल्यास त्वरित आरोग्य कर्मचारी किंवा जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन रक्तजल नमुना तपासून घ्यावा. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने औषध उपचार घ्यावा. आणि रुग्णांनी जास्तीत जास्त विश्रांती घ्यावी. जर त्वरित उपचार केले नाही तर यामुळे गंभीर आरोग्य गुंतागुंत होऊ शकते.
प्रतिबंधात्मक उपाययोजना:-
प्रतिबंधात्मक उपाय नेहमीच उपचारापेक्षा प्रभावी ठरत असते. म्हणून डासांवर नियंत्रण ठेवणे हा अत्यंत महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना पुढीलप्रमाणे:-
1) गृहभेटी दरम्यान कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करून डास अळींची घनता काढून,ॲबेटिंग करणे हा महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे.
2) आरोग्य शिक्षण देणे हा सर्वात मोठा प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यामध्ये डेंग्युताप जनजागृती करणे,शाळा महाविद्यालयाच्या माध्यमातून डेंग्युताप जनजागृती रॅली काढणे, भिंतीवर म्हणी, सार्वजनिक ठिकाणी डेंग्युतापविषयी माहिती देणे,अशा प्रकारे डेंग्युताप बद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून सहज शक्य होते व डेंग्युताप प्रतिबंध किंवा डासास प्रतिबंध घालण्यास मदत होऊ शकते.
3) डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. गावांमधील कायमस्वरूपी व तात्पुरते स्वरूपाचे डासोत्पत्ती स्थाने ग्रामपंचायतच्या माध्यमातून नष्ट करणे व नाली वाहती करणे.आणि घराजवळील परिसर स्वच्छ ठेवणे.
4) कोरडा दिवस पाळणे हा महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे. आठवड्यातून पाणी साठवण्याची भांडी रिकामी करून घासून,पुसून,कोरडी करावी.
"कोरडा दिवस पाळा, डेंग्यूताप टाळा."
5) डास अळी भक्षक गप्पी मासे,गावातील पाण्याच्या साठ्यामध्ये जसे,तलाव,डबके ओढा यामध्ये सोडण्यात यावे.हा अत्यंत महत्त्वाचा डास नियंत्रणासाठी जैविक प्रतिबंधात्मक उपाय आहे.
"गप्पी मासे पाळा, किटकजन्य आजार टाळा."
6) कीटकनाशक भारित मच्छरदानीचा वापर रात्री झोपताना करावा,पूर्ण अंग झाकेल असे कपडे वापरावे व डास प्रतिबंधात्मक क्रीम वापरावी.
7) घरातील रांजण,माठ, टाकी, हौद यांना घट्ट झाकण किंवा झाकण नसल्यास कापड बांधावे तसेच कुंड्या, टायर्स, कुलर, फ्रिज व अन्य वस्तूमध्ये जास्त काळ पाणी साचून राहणार नाही,याची दक्षता घ्यावी.कारण ह्यामधेच एडिस इजिप्ती डास अंडी घालतो.
8)लोकांना एडिस डासाचे जीवन चक्र माहित असणे खूप महत्त्वाचे आहे.कारण डास कसा तयार होतो आणि डासाची उत्पत्ती कशी होते,हे जर माहीत झाल्यास लोक डास नियंत्रणासाठी उपाययोजना करतील.
9) गावांमध्ये व शाळेमध्ये डास निर्मूलनाची शपथ घेऊन डासाचे गांभीर्य जनतेपर्यंत पोहोचवणे.
10) ॲबेटिंग, कीटकनाशक फवारणी,धूर फवारणी करणे यामुळे डासांची घनता कमी होण्यास मदत होते. ॲबेट मिश्रण तयार करताना 980 मि.ली.पाण्यात 20 मि.ली. ॲबेट किंवा टेमिफॉस टाकून ॲबेटिंग करावी.तसेच धूरफवारणी साठी 5 लिटर डिझेल,2 लिटर पेट्रोल,250 मि.ली.पॅयरॉथ्रिन डिझेल मध्ये समिश्र करून धूरफवारणी करावी.
⚫जनतेचा सहभाग खूप महत्वाचा:-
सार्वजनिक आरोग्य विभाग व राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा हिवताप कार्यालय मार्फत डेंग्युताप व किटकजन्य आजारावर नियंत्रण करण्यासाठी विविध उपक्रम व उपाययोजना केल्या जातात. डासांवर नियंत्रण करण्यासाठी किंवा डेंग्युताप आजार नष्ट करण्यासाठी गावातील नागरिकांचा सक्रिय सहभाग खूप महत्त्वाचा आहे. यासाठी नागरिकांनी आरोग्य कर्मचारी यांना सहकार्य करून डास निर्मूलन करण्यासाठी पुढे यावे. जेणेकरून आपल्या गावात किटकजन्य आजार होणार नाहीत.म्हणजेच आपला गाव डेंग्युताप मुक्त किंवा किटकजन्य आजार मुक्त गाव राहील.
अशाप्रकारे डॉ. आर. एम.सोनवणे जिल्हा हिवताप अधिकारी ,जिल्हा हिवताप कार्यालय परभणी. डॉ. व्ही. आर.पाटील तालुका आरोग्य अधिकारी,पूर्णा.*डॉ.सुरेश गिनगीने वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केंद्र- कावलगाव.श्री. टि.एस. इनामदार आरोग्य निरीक्षक* प्रा.आ.केंद्र- कावलगाव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त डेंग्यूताप प्रसारक एडिस इजिप्ती डासाची ओळख, जीवनचक्र व प्रतिबंधात्मक उपाययोजना. हा जनजागृती पर लेख लिहून, माहिती देण्यात येत आहे.
संकलन:-
श्री.मोहन रामदास वाटगुरे
आरोग्य कर्मचारी (MPW), उपकेंद्र-चुडावा
प्रा.आ.केंद्र-कावलगाव,
ता.पूर्णा,जिल्हा हिवताप कार्यालय-परभणी.
मो.नं.7498036700
आपल्या प्रतिक्रिया द्या....