आरमोरी:... येथील तथागत बुद्ध विहारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळाच्या वतीने सोमवारी बुद्ध जयंतीनिमित्ताने सकाळी धम्म रैली काढून तथागत गौतम बुद्धांचा मैत्री, करुणा, बंधुभाव व शांतीचा संदेश देण्यात आला.
आरमोरी येथील तथागत बुद्ध विहारातून सकाळी ७ वाजता धम्म रॅलीला सुरुवात झाली. सदर रॅली आरमोरी शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली. रॅलीत आरमोरी शहरातील शेकडो बौद्ध उपासक-उपसिका पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून व पंचशील ध्वज पकडून सहभागी झाले होते. रॅलीत तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून जयघोष करण्यात आला. रॅलीत महिलांनी बुद्ध भीम गीतेही गायली. रॅलीदरम्यान ठिकठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची सोय, व खीर दान करण्यात आली होती. धम्म रॅलीचा समारोप तथागत बुद्ध विहारात करण्यात आला. यावेळी विहारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळाचे अध्यक्ष मदन मेश्राम यांनी पुष्प मला अर्पण करून वंदन केले. तर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण सामाजिक कार्यकर्ते जयकुमार मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
विहारात भंते राहुल बोधी यांनी सामूहिक बुद्ध वंदना घेऊन धम्मदेशना केली .संचालन स्मारक मंडळाचे उपाध्यक्ष अमरदीप मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन मंडळाचे सचिव जयकुमार शेंडे यांनी केले. कार्यक्रमाला बौद्ध उपासक-उपासिका व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.