कारंजा (लाड) : सध्या पावसाळ्याचे दिवस असून, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीची मात्र मनमानी सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, सध्या पावसाळा सुरु असला तरी सुद्धा वातावरणात वापशा मुळे उन्हाळ्या प्रमाणे गर्मी असून, जनतेच्या अंगातून घामाच्या धारा वहात असतात.मात्र याचे विज वितरण कंपनीला कोणतेही सोयर सुतक नसून त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. गेल्या काही महिन्या पासून विद्युत युनीटचे दर वाढल्यामुळे ग्राहकांना दुप्पट ते तिप्पट दराने विद्युत देयके दिली जात असून,बिचारे ग्राहक दर महिन्याला भूर्दंड सोसून,देयके अदा करीतच आहेत.मात्र तरीही विज वितरण कंपनी कडून, अघोषीत भारनियमन सुरू झालेले असून,रात्री ,बेरात्री, भर दुपारी, सांयकाळी मनात येईल तेव्हा तासन्तासच नव्हे तर दोन दोन तास विज पुरवठा खंडीत करण्यात येऊन ग्राहकांना त्रस्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे याचा त्रास लहान बालके, गरोदर महिला,दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती,शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांना चांगलाच होत असून, ग्राहकांच्या तक्रारीची देखील दखल घेण्यात येत नसल्यामुळे ग्राहकामधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.तरी जनतेच्या तक्रारीची विज वितरण कंपनी आता तरी दखल घेणार काय ? तसेच लोकप्रतिनिधी विद्युत कंपनी विरोधात आवाज उठवणार काय ? ह्याकडे जनतेचे लक्ष्य लागले असल्याचे दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे .