वाशिम : गेल्या दि. 04 मार्च पासून सहाय्यक उपायुक्त समाज कल्याण कार्यालय वाशिम येथे कलावंत मानधन मंजूरी करीता लाभार्थी कलावंताच्या प्रत्यक्ष मुलाखती आणि सादरीकरण सुरु असून आज सादरीकरणाचा चौथा दिवस होता.यावेळी कलावंताच्या तक्रारीवरून आमच्या प्रतिनिधीने सदर्हू प्रक्रिया जाणून घेण्याकरीता फेरफटका मारला असता कलावंताच्या मुलाखती घेण्याकरीता कोणीही अभ्यासू,जबाबदार असे कलावंताचे सादरीकरण घेणारे परिक्षक किंवा अधिकारी आढळून आले नाहीत. त्याचप्रमाणे कलावंताना पंधरा ते विस वर्षाचे साक्षी पुरावे म्हणून प्रमाणपत्र, छायाचित्र व वृत्तपत्रिय कात्रणाची मागणी करण्यात येत होती.अनेक कलावंताकडे कोणतेही साक्षी पुरावे नसल्यामुळे त्यांना परत पाठविण्यात येत होते.तसेच कलेचे सादरीकरण व्यासपिठावर न घेता बंद कॅबीनमध्ये घेण्यात येत होते. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षाच्या पाच बैठकी घेऊन पाचशे कलावंताना मानधन मंजूर केल्या जाणार किंवा केवळ शंभर कलावंतानाच मानधना करीता पात्र ठरविण्यात येणार ? तसेच सार्वत्रिक निवडणूकीच्या आचार संहिते अगोदर कलावंताना मानधन मंजूर केल्या जाईल किंवा नाही याकडे जिल्ह्यातील कलावंताचे लक्ष्य लागले आहे.