कारंजा (लाड):
श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयाचे दि. जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्काराचे मानकरी, करंजमहात्म्यचे संपादक तथा पत्रकार दिव्यांग समाजसेवक, संजय मधुकर कडोळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. तसेच ध्वजारोहणानंतर, शिक्षण, कला, क्रिडा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ग्रंथालय प्रदर्शनीचे उद्घाटनही करण्यात आले.
सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे, कलावंतांच्या न्याय हक्कांसाठी झटणारे तसेच करंजमहात्म्य सारख्या साप्ताहिकांमधून आपल्या लेखणीने समाजमनावर छाप पाडणारे संजय कडोळे सर्वश्रुत असे व्यक्तिमत्व आहे. घरची कौटिंबीक व आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून सुद्धा या परिस्थितीमध्ये ते सतत समाजाभिमुख काम करताना दिसतात. अपघाताने आलेल्या दिव्यांगत्वावर मात करीत त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक सेवेचे व्रत अंगीकारले आहे. त्यांना या कार्याकरिता विविध राज्यस्तरीय पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहे. कष्टकरी दिव्यांगांच्या हस्ते श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयाचे ध्वजारोहण करण्याची अभिनव परंपरा आहे. स्वर्गीय बाबासाहेब धाबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी ही परंपरा सुरू केली होती.यापूर्वी महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग पालकांच्या त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तुत्वान व्यक्तींच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालेले आहे. १५ ऑगस्ट २०१७ ला पारवा कोहर येथील अंध पालक रमेश डोंगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. २६ जानेवारी २०१८ रोजी पोहा येथील मुकबधीर पालक गजानन तायडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. १५ ऑगस्ट २०१८ ला मांडवा येथील अपंग पालक व कर्णबधीर आई पंचशीला बाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. २६ जानेवारी २०१९ रोजी भडशिवणी येथील अपंग पालक काशीराम आडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

१५ ऑगस्ट २०२० ला मांडवा येथील अपंग पालक विनोद सोनोने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. २६ जानेवारी २०२० रोजी अमरावती येथील अंध कविता पेंढारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. १५ ऑगस्ट २०२० ला कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण रुग्णालय कारंजा येथील कोरोना योद्धा ठरलेल्या तीन परिचारिका विद्या भुसारे, रजनीताई गायकवाड, अलका भुसारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. २६ जानेवारी २०२१ रोजी अमरावती येथील अंधजन विकास संस्थेचे सचिव शाकीर नायक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. १५ ऑगस्ट २०२१ रोजी अमरावती येथील प्रसिद्ध दिव्यांग जलतरणपटू पाणेरी पासड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. २६ जानेवारी २०२२ रोजी शेवती येथील दिव्यांग पालक कैलास राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. १५ ऑगस्ट २०२२ रोजी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी तसेच घड्याळी तासिकेवर कार्यरत असलेले प्रा. श्याम इंगोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यामळे विद्यापीठाच्या परिक्षेत्रात महाविद्यालयाच्या उपक्रमांची दखल घेतल्या गेली. याच स्तुत्य आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून महाविद्यालयास पुरस्कारही प्राप्त झाला आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष गवई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमास महाविद्यालय विकास समितीचे सदस्य विजय काळे, भुजंगराव वाळके, विधिज्ञ विजय बगडे. तसेच प्रकाश खानबरड, प्रदीप वानखडे, दिलीप दवंडे उपस्थित होते. संजय कडोळे यांनी आपल्या मनोगतातून बोलतांना, दिव्यांग जनांच्या वेदना मांडीत, दिव्यांग जनांना सहानुभूती देऊन मुख्य प्रवाहात आणण्याकरीता, सर्वप्रथम महाविद्यालयाचे अध्यक्ष सुनिल पाटील धाबेकर तथा प्राचार्य डॉ सुभाष गवई यांच्या मार्गदर्शनातून महाविद्यालयाकडून दिव्यांग व्यक्तीच्या हस्ते होत असलेल्या आदर्श अशा ध्वजारोहण उपक्रमाचे कौतुक करीत अध्यक्ष सुनिल पाटील धाबेकर तथा प्राचार्य डॉ सुभाष गवई यांचे मनःपूर्वक आभार मानले, तसेच महाविद्यालयाला लाभलेल्या साहित्यीक प्राचार्य डॉ सुभाष गवई यांनी अंध बांधवाकरीता सुरु केलेल्या पंचक्रोशीतील पहिल्या ब्रेल लिपी मधील साहित्याच्या ग्रंथालयाबद्दल प्रशंसा केली . त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सुद्धा योग्य मार्गदर्शन केले. महाविद्यालयाने यानिमित्ताने संजय कडोळे यांचा शाल, पुष्पगुच्छ व ग्रंथ देऊन सत्कार केला. त्यांचा झालेला हा सन्मान इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, डॉ कैलास गायकवाड, डॉ अशोक जाधव, प्रा. उमेश कुराडे, डॉ.योगेश पोहोकार, प्रा. राहुल रडके, प्रा. पराग गावंडे, प्रा. नितेश थोरात, प्रा.मयूर वडते, राजेश अढाऊ, उमेश देशमुख, प्रवीण डफडे, बाळकृष्ण खानबरड, राजू राऊत, प्रकाश लोखंडे, अरुण ईसळ, सुनील राजगुरे यांनी अथक परिश्रम घेतले. असे वृत्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे महाविद्यालयाकडून कळवीण्यात आले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....