कारंजा : जनतेला विश्वासात न घेता अचानकपणे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी दि . ८ नोहेंबर २०१६ रोजी रात्री केन्द्रशासनाकडून निर्णय घेत, नोटबंदीची घोषणा केली. त्यानंतर चलनातील पाचशे रुपयाच्या नोटा बदलून घेण्याची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. कथीत काळेधन किंवा साठेबाजांनी जमवून ठेवलेला काळा पैसा बाहेर काढण्याकरीता हा निर्णय घेतला असल्याचे प्रयोजन त्यावेळी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी सांगीतले होते. निवडक व्यक्तिंनी जमवून ठेवलेला हा काळा पैसा देशातील गोरगरीब जनते करीता आणि देशाकरीता वापरण्यात येणार असल्याचे चॉकलेटही देण्यात आले. त्यानंतर ठिकठिकाणी धाडसत्रही राबविण्यात आल्याचा व काळे धन जमा केले असल्याचा बागुलबुवा करण्यात आला. पाचशे रुपयाची जुनी नोट चलनातून हद्दपार झाली व शासनाने नवी कोरी करकरीत दोन हजार रुपयाची गुलाबी नोट चलनात आणली. पुढे दोन हजाराच्या नोटेचे सुटे पैसे कैसे करावे ? हा प्रश्न तळागाळातील सामान्य व्यक्तिला पडू लागल्याने, गोरगरीब मध्यम वर्गीयांना ही दोन हजार रुपयाची नोट डोकेदुखी ठरणार की काय ? असे सुद्धा वाटू लागले.आज या गोष्टीला जवळ जवळ सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र सुरुवातीला केवळ निवडक काहीशा कालावधी पर्यंतच ही नोट चलनात किंवा बाजरपेठेत राहीली. आज मात्र दोन हजाराची नोट चलनातून अदृश्य झालेली असून ती कोठे गेली ? तीचे झाले तरी काय ? असा प्रश्न नागरिकांना त्रस्त करून सोडत आहे. मात्र दोन हजारच्या अदृश्य होण्यामुळे आता साठेबाजीचा भ्रष्टाचार सन २०१६-१७ पेक्षाही कैक पटीने वाढला असल्याचीही शक्यता नाकारता येत नसल्याचे वास्तव या दोन हजारच्या अदृश्य नोटे मुळे जनमाणसांना दिसून येत आहे. एवढे मात्र निश्चित.तरी शासनाने या नोटेच्या शोधार्थ परत एकदा दोन हजार रुपयाच्या चलनी नोटेवर बंदी आणणे गरजेचे ठरणार असल्याचे मत दिव्यांग समाजसेवक संजय कडोळे यांनी प्रसिद्धी माध्यमांकडे व्यक्त केले आहे.