ब्रह्मपुरी तालुक्यातील चकबोथली (कसर्ला) व चौगान येथे मागील काही दिवसांपासून अवैध दारूविक्रीला उधाण आले आहे. परंतु पोलिस प्रशासनाचे दारू विक्रेत्यांकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याने गावातील सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तालुक्यातील सर्वात विकसित, शिक्षित आणि विशेष म्हणजे आदर्श गाव म्हणून चकबोथली गावाची ओळख आहे. तसेच शिक्षित तथा सैनिकांचा गाव अशी ओळख चौगानची आहे परंतु अवैध दारूविक्रीने चकबोथली, चौगान गावच्या प्रतिष्ठा धोक्यात आली आहे.
गावातील बाहेरील नहराच्या पाळीला तसेच मुख्य गावाच्या चौकात अवैधरित्या दारूविक्री होत आहे. या तळीरामाच्या त्रासाला अनेक मुलींना, महिलांना व शेजारी राहणाऱ्या जनतेला सामोरे जावे लागते.
चौकाच्याच ठिकाणी हे अवैध दारूचे अड्डे सुरू करण्यात आले आहेत.वार्डनशॉप पेक्षा पाच ते दहा रुपये जास्त दर आकारून ही देशी दारू विकण्यात येते. या दारूने गावातील अनेक कुटुंबाची होळी केली आहे. गावातील तरुण दारूच्या आहारी जात आहे. दारूच्या आहारी गेलेले तळीराम दारू पिण्यासाठी घरातील साहित्याची विक्री करून आलेल्या पैशातून मद्यप्राशन करीत आहेत. वेळेवर पैसे मिळाले नाही तर चोरीचे प्रकार घडत आहेत. दारूविक्रीच्या दुष्परिणामामुळे ग्रामपंचातीतर्फे अवैध दारूविक्री विरोधात मोहीम हाती घेतली होती. परंतु याचाही परिणाम या अवैध दारूविक्री
करणाऱ्यांवर झाला नाही. त्यामुळे अवैध दारूविक्री करणाऱ्यांना कुणाचावरदहस्त लाभलेला आहे? अशा प्रकारची चर्चा गावात आहे. यासर्व प्रकाराला गावातील महिलांसह, नागरिक मोठ्या संख्येने कंटाळले आहेत. लवकरात लवकर या अवैध दारू विक्रीला आळा घालण्यात यावी, अशी मागणी चौगावासियांनी केली आहे.