कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे): शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कारंजा शहरात आजूबाजूच्या चारही जिल्ह्यातून विद्यार्थी शिक्षणाकरीता येत असतात. कारंजा येथील चवरे बंधूच्या शैक्षणिक संस्था जे डी चवरे विद्या मंदिर,जे सी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय,कंकुबाई गर्ल्स हायस्कूल इत्यादी येथील जुन्या संस्थाचा नावलौकीक होता व आजही कायम आहे.कारंजा येथे कृषीमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख, संगणक संशोधक डॉ.विजय भटकर यांचे एकेकाळी नगर पालिकेच्या मुल्जिजेठा हायस्कूल मध्ये शिक्षण झाल्याचा इतिहास असतांना आज मात्र पालकांचा ओढा खाजगी शिक्षण संस्थाकडे जातांना आपणास पहायला मिळतो.त्यामुळे कारंजा येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पहाता संधीचे सोने करून घेण्याकरीता अनेक स्थानिक लोकांनी आणि पंचक्रोशीच्या शेतकरी बांधवानी शिक्षण क्षेत्राला "सोन्याची अंडी देणारी कोंबडी" समजून आपआपल्या खाजगी कॉन्व्हेट,प्राथमिक शाळा (इंग्रजी माध्यम),विद्यालये उघडली आहेत.व साध्या कॉन्व्हेन्टच्या के जी वन प्रवेशाकरीता पालकांकडून कमितकमी पंचवीस हजार रुपये ते लाखो रुपये देणगी घेऊन कॉन्व्हेन्ट चालक प्रवेश करून घेत आहेत.तर खाजगी विद्यालयात विद्यार्थी प्रवेशा करीता दोन दोन लाख रुपये उकळण्यात येत असल्याची चर्चा आहे.या व्यतिरिक्त या कॉन्व्हेन्ट, प्राथमिक शाळा,विद्यालयात विद्यार्थी प्रवेशा करीता विद्यार्थ्यांना व त्यांच्या आईवडिल पालकांची मुलाखत परिक्षा घेतल्या जाते.आई वडिलांना इंग्रजी लिहीता बोलता येते का ? याची चाचणी परिक्षा घेऊनच विद्यार्थी प्रवेश दिल्या जातो.मात्र याउलट पालकांची मुलाखत घेणाऱ्या या कॉन्व्हेंट,प्राथमिक शिक्षकाचा शिक्षकवृंद मात्र खरोखर विद्यार्थांना ज्ञानार्जन करण्यास पात्र आहे का ? याकडे मात्र कुणाचेही लक्ष्य नाही.तसेच महत्वाचे म्हणजे यापैकी बऱ्याच खाजगी संस्था विनाअनुदानीत असून त्यांच्या शिक्षकांना त्यांचेकडे मोफत किंवा अल्पशा पगारावर शिक्षणाचे दान करावे लागत आहे.त्यामुळे काहीच्या मते काही शैक्षणिक संस्था, कॉन्व्हेन्ट मध्ये केवळ दहावी बारावी तरुणींना शिक्षीका म्हणून नोकरीस ठेवले आहे.त्यामुळे येथे प्रश्न उपस्थित होतो की,दहावी बारावी झालेल्या महिला विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ शकतात काय ? हे पाहणे काळाची गरज आहे.व त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण क्षेत्राला बदनाम करणारा काळ्या बाजाराला अंकुश लावण्याकरीता कारंजा शहरातील सर्व कॉन्व्हेन्ट व प्राथमिक तसेच माध्यमिक शाळाच्या शिक्षिकांची शैक्षणिक पात्रता तपासणी करणे जरूरी असल्याचे परखड मत अनेक पालकांकडून व्यक्त केले जात आहे.