कारंजा (लाड) :- दि.26 जानेवारी 2025 रोजी वाशिम येथील पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे शासकीय ध्वजारोहणानंतर वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसन मुश्रीफ साहेब यांनी महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिम यांच्या वतीने संस्था क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थेचा "जिल्हा युवा पुरस्कार 2023-24" सर्व धर्म मित्र मंडळ कारंजा या संस्थेला प्रदान केला.या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह,सन्मानपत्र तथा पन्नास हजार रुपयाचे रोख पारितोषिक असे आहे.यावेळेस पालकमंत्र्याच्या हस्ते स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र,पुष्पगुच्छ तथा पन्नास हजार रुपयाचा धनादेश - सर्व धर्म मित्र मंडळ कारंजाच्या वतीने श्याम सवाई,अजय ढोक,राजू कांबळे दीपक सोनवणे,पंकज चव्हाण यांनी हा पुरस्कार स्वीकारला.पुरस्कार वितरण सोहळ्याला जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. ; पोलीस अधीक्षक अनुज तारे ; मुख्य कार्यपालन अधिकारी वैभव वाघमारे ; निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे ; जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता व अन्य मान्यवर उपस्थित होते.
सर्व धर्म मित्र मंडळ गेल्या पंचवीस वर्षापासून वाशिम जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमात आपले सामाजिक दायित्व सिद्ध करत आहे . त्यांच्या ह्या कार्याची दखल घेऊन त्यांना जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे . सर्व धर्म मित्र मंडळाचे सल्लागार निलेश सोमानी व सौ.भारती सोमानी यांचे मार्गदर्शन संस्थेला नेहमी उपक्रमाकरिता लाभत असते.सोमानी दाम्पत्य सदैव संस्थेला विविध स्वरूपात व वैयक्तिक स्वरूपातही आर्थिक रूपाने वेळोवेळी सहकार्य करीत असतात. श्याम सवाई व सर्वधर्म मित्र मंडळाला पुरस्कार मिळाल्याबद्दल विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार सन्मान प्राप्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी आनंद व्यक्त केला असून पुरस्कारार्थी मंडळाचे अभिनंदन केले आहे.