संपूर्ण विदर्भात प्रखर उष्णतेची लाट येण्याचा अंदाज असून सध्या कारंजा शहरातील तापमानाने सुद्धा उच्चांक गाठला असल्याचे निदर्शनास येत आहे. शनिवारी कारंजा शहरातील तापमान 41 सेल्सियस होते.त्यामुळे शहरातील गजबजलेल्या गर्दीचे चौक आणि रस्ते निर्मनुष्य झाल्याचे दिसून येत होते. पुढील काही दिवसात वातावरणातील बदलामुळे तापमान आणखी उच्चांक गाठण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे नागरीकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. यातही महत्वाचे म्हणजे अचानक दिवसा आणि रात्री सुद्धा विज पुरवठा अचानक खंडीत होतो आहे.त्यामुळे ए सी किंवा कुलरचा वापर करणाऱ्यांनी तसेच ए सी गाड्यामधून प्रवास करणार्यांनी विशेष दक्षता घेणे जरूरी आहे. अचानक ए सी किंवा कुलरमधून बाहेर पडल्यास उष्माघात होण्याची शक्यता असते. तसेच फ्रिजमधून थंड केलेले पाणी न पिता,मातीच्या माठामध्ये थंड झालेले पाणी प्यावे.बांधकाम मजूर व शेतमजूरानी उपाशी पोटी कामे करू नयेत, काहीतरी न्याहारी करावी आणि रखरखत्या उन्हात कामे न करता सकाळ - सायंकाळ या दोन सत्रात कामे करावी. दुपारी जेवणानंतर विश्रांती घ्यावी.चाकरमान्यांनी व प्रवाशांनी पिण्याच्या पाण्याची बॉटल सोबत ठेवावी.व आरोग्यदायी कांदा व भिमसेनी कापूर खिशात सोबत ठेवावा. कांदा आणि भिमसेनी कापुराचा वास अधून मधून घेतल्यास उष्माघातापासून १००% संरक्षण मिळते. घशाला कोरड पडत असल्यास मिठ साखर पाणी घ्यावे.सायंकाळी थंड पाण्याने आंघोळ करावी. उन्हाळ्याच्या दिवसात जड अन्नपदार्थाचे आणि तेलाचे तळलेले पदार्थ, रोटग्याचे जेवण, मांसाहार,तर्रीची भाजी टाळावी.आहारात हलके अन्नपदार्थ,मोड आलेली कडधान्य,पालेभाज्या व फळाचा समावेश असावा.अशाप्रकारे आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यावी.असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवी संजय कडोळे यांनी केले आहे.