ब्रम्हपुरी :- महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालय, आरमोरी येथील वाणिज्य शाखेतील प्रा. तेजस यादवराव गायधने यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर कडून वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील व्यवसायिक अर्थशास्त्र या विषयात आचार्य (Ph.D.) पदवी प्रदान करण्यात आली आहे.
*"गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीचा आदिवासींच्या आर्थिक व व्यावसायिक स्थितीवर झालेल्या परिणामांचे चिकित्सात्मक अध्ययन"* या विषयावर त्यांनी प्रा. डॉ. वासुदेव जे. चौधरी (संशोधन केंद्र – विद्या विकास महाविद्यालय, समुद्रपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले.
प्रा. तेजस गायधने हे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील जनकापूर येथील रहिवासी आहेत. त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण कृषक विद्यालय कोटगाव, उच्च माध्यमिक शिक्षण महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय तळोधी (बालापुर) येथे पूर्ण केले. बी.कॉम. पदवी गोविंदराव वारजूकर महाविद्यालय, नागभीड येथून, एम.कॉम. पदव्युत्तर पदवी नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथून, तर एम.फिल. पदवी सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथून प्राप्त केली आहे. त्यांनी २०१५ मध्ये वाणिज्य विषयात नेट व सेट परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे.
सध्या प्रा. गायधने हे महात्मा गांधी महाविद्यालय, आरमोरी येथे अंशकालीन सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल मनोहर भाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, सचिव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. मनोज ठवरे, सहकारी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, मित्रपरिवार तसेच पत्नी सौ. अंकिता गायधने यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशामागे माझ्या महाविद्यालयाचा व सहकाऱ्यांचा मोठा वाटा असून मी सर्वांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया प्रा. तेजस गायधने यांनी व्यक्त केली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....