गडचिरोली दि. १ : जिल्ह्यात अनुकंपा नियुक्ती प्रकरणांना गती देण्यासाठी शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आज अनुकंपा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यामध्ये २८६ उमेदवारांच्या सामाईक प्रतीक्षा यादीतून ७३ उमेदवारांनी सहभाग घेतला. त्यांच्याकडून तीन पसंतीच्या विभागांची नावे अर्जावर भरून घेण्यात आली. नोंदवलेल्या प्राधान्यक्रमानुसार उमेदवारांना त्यांच्या आवडीच्या विभागात सेवा करण्याची संधी मिळणार आहे.
मेळाव्यामध्ये विविध १३ विभागांकडून प्राप्त झालेल्या ५३ पदांच्या मागणीपैकी, प्राथमिक टप्प्यात ४३ पदे अंतिम करण्यात आली आहेत. याच पदांवर नियुक्ती प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
या वेळी उमेदवारांचे समुपदेशन करण्यात आले. त्यांच्या शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक प्रमाणपत्रांची काटेकोर पडताळणी करण्यात आली, तसेच शारीरिक तपासणीही करण्यात आली.
या मेळाव्यासाठी १५ नियुक्ती अधिकारी कार्यालयांचे अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी उमेदवारांना मार्गदर्शन करताना, अनुकंपा नियुक्ती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकतेने राबविण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, तसेच आस्थापना शाखेचे तहसीलदार संजय जयस्वाल व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.