अकोला - आज वाचकांना विविध माध्यमातून काय वाचावे हे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आधुनिक काळामध्ये डिजिटल युग असल्याने काय वाचावे आणि काय वाचू नये अन् जे वाचले जातात ते कसे वाचावे हेही तेवढेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन अकोला महानगरपालिकेचे आयुक्त अजय लहाने यांनी केले.
स्थानिक बाबूजी देशमुख वाचनालयाच्या दिवाळी अंक ग्रंथ प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. वाचनालयाचे अध्यक्ष महादेवराव भुईभार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. वाचनालयाचे उपाध्यक्ष प्रा. सुरेश राऊत, सचिव अनुराग मिश्र, वाचनालयाच्या कार्यकारिणीचे सदस्य प्रशांतभाऊ देशमुख, प्रवीण वाणी, प्रा.डॉ.
मोहन खडसे, प्रा. बबनराव कानकिरड, सर्पमित्र बाळ काळणे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन कार्यकारिणीचे सदस्य प्रा. डॉ.मोहन खडसे यांनी केले.
स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी व चोखंदळ वाचकांसाठी अशाप्रकारचे दालन उपलब्ध करून देण्याची परंपरा बाबूजी देशमुख वाचनालयाचे निरंतर चालवली ही बाब अवघ्या महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असल्याचे भावोद्द्गार आयुक्त लहाने यांनी काढले.
उद्घाटन प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष महादेवराव भुईभार यांनी आपले विचार व्यक्त केले. या ग्रंथप्रदर्शनीत सुमारे 200 विविध प्रकारचे दिवाळी अंक ठेवण्यात आले असून वाचकांना त्याच ठिकाणी निवांत बसून हे व काही निवडक ग्रंथ वाचता येतील. महाराष्ट्रात विविध प्रकारच्या मराठी दिवाळी अंकांचे प्रकाशन करण्यात येते ज्याच्या वाचनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असतो.
या अंक व ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन प्रसंगी वाचनालयाचे कर्मचारी ग्रंथपाल सुरेश टेके सतीश डगवाले , जुगलकिशोर सिरसाठ, नितीन कदम, स्वप्निल ताथोड, सुनील मिश्रा,यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.