अकोला- पालघर जिल्ह्यात डहाणू तालूक्यातील वाढवण बंदराच्या निर्मितीला तेथील नागरीकांचा तीव्र विरोध होत असून त्या परिसरात फिरणाऱ्या पर्यटकांवर गावातील लोकांची सतत नजर असते.नागरीकांच्या टेहळणीत वाढवण बंदरात येणारांवर ग्रामस्थ नजर ठेऊन असतात.कधी कधी प्रशासनातील अधिकारी समजून जमाव अंगावर चालून येण्याचे प्रकार येथे घडत असल्याची माहिती या भागातील पत्रकार मंडळीकडून मिळाली.तरीही लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या संपर्क तंत्रातून वाढवणमधील मानवधिकारी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष असलेले दिनेश सुतारी हे लोकस्वातंत्र्यचे संस्थापक - अध्यक्ष संजय एम.देशमुख यांचे अगोदरच मित्र होते.त्यांनी वाढवण बंदराच्या पाहणीसाठी व तेथील प्रश्न समजून घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांसह भेटीचे निमंत्रण दिले होते. आपण यावे कुठे अडचण आल्यास माझा संदर्भ द्यावा असे सांगून त्यांनी आश्वस्त केले होते.त्यानुसार कोकणदर्शन दौऱ्यादरम्यान पालघर जिल्हा पदग्रहण समारंभानंतर लोकस्वातंत्र्यची टीम वाढवण बंदरात दाखल झाली.
खरोखरच गावात गाड्या शिरल्याबरोबर तेथील चार तरुण मोटारसायकलने गाड्यांचा पाठलाग करत बंदरावर पोहचले.पदाधिकाऱ्यांच्या गळ्यातील ओळखपत्रांची पाहणी करायला लागले.त्यांना आपल्याच गावातील मानवधिकारी संघटना राज्याध्यक्ष दिनेश सुतारी यांचे लोकस्वातंत्र्य अध्यक्ष हे मित्र असल्याचे समजले.त्यांनी निमंत्रित केल्यावरून आलेले पत्रकार हे त्यांचे प्रश्न समजून घेणारे हितचिंतक असल्याची खात्री पटल्यानंतरच ते तरूण परत गेले.
वाढती महागाई आणि शासनाच्या उफराट्या वाटचालीने निर्माण झालेले प्रश्न सतत कायम असतात.अशातच हक्कांच्या मागण्या करतानाच अन्यायाचे घाव सोसणारे श्रमिक,शेतकरी जेव्हा हतबल होतात,तेव्हा न्याय मिळत नाही म्हणून ते प्रक्षुब्ध होतात,क्रोधित होतात. असे असतांनाच आता स्वतःच्या हक्काच्या घरादारावर,शेतजमिनीवर वरवंटा फिरणार अशी चाहूल जेव्हा त्यांना लागते, तेव्हा अस्तित्वाच्या प्रश्नांसाठी ते संघटीत होतात...जागृत होतात,आणि आता कोणत्याही परिस्थितीत आलेले वार परतवायचे,स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी दोन हात करून झगडायचे... असाच निश्चय त्यांनी मनाशी केलेला असतो.मग तो टेहळणी करतो.आपला घास हिसकावून घेऊन जाणारांवर आणि त्यांना मदत करणारांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतो.त्यासाठी प्रतिज्ञेने संघटीत होतो.असाच उठाव सध्या वाढवण बंदराला विरोध करण्यासाठी होत आहे.भविष्यात उद्भवणाऱ्या चिंतनिय समस्यांमुळे वाढवण बंदर रद्द करा अशी येथील नागरीकांची मागणी आहे.शासनाने जनभावनांना अव्हेरून घाईगर्दीत कुठला निर्णय न घेता नागरिकांच्या हिताचे रक्षण कसे केले जाईल यावर सर्वांगीण अभ्यास करावा.कारण अशा जखमा ह्या अनंत काळ स्मरणात राहणाऱ्या असतात.त्यामुळे याबाबत योग्य तो विचार व्हावा अशी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख संघटनेची शासनाकडे मागणी आहे.
आपली भाकरी कोणी हिसकावू नये म्हणून डोळ्यांत तेल घालून गावात येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात आपल्या दैनंदिन जीवनातील अधिक वेळ येथील नागरिकांना खर्च करावा लागत आहे.दिनेश सुतारी यांनी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाशी मित्रत्व प्रस्थापित करून वेळ काढून हे नियोजित बंदर सर्वांना दाखवून देण्याचा प्रयत्न केल्यामुळे वाढवण संदर्भातील संवेदनशील परिस्थितीची माहिती घेता आली.गावकऱ्यांच्या तीव्र भावना समजून घेता आल्या.त्याबध्दल पत्रकार महासंघाकडून श्री दिनेश सुतारी यांना धन्यवाद व्यक्त करण्यात आले.