अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) ही देशातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सामाजिक कार्यासाठी ओळखली जाते. शिक्षण, सेवा आणि राष्ट्रनिर्माण या तत्त्वांवर आधारित, अभाविप अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत असते. अभाविपच्या सेवार्थ विद्यार्थी या गतिविधि द्वारे, सेवा आणि समाजकार्याच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच अंतर्गत, गणेश उत्सवाच्या निमित्ताने कारंजा लाड शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
हे शिबिर स्थानिक कामाक्षा माता मंदिर येथे आयोजित करण्यात आले, ज्यात स्थानिक नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. विशेषतः, अभाविप नगर उपाध्यक्ष प्रा.रोहन जाधव आणि रोहित महाजन यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केले. रोहित महाजन यांनी आपले २६ वे रक्तदान पूर्ण केले, ज्यामुळे त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
शिबिरात एकूण ३३ लोकांनी रक्तदान केले, ज्यात ३ महिलांचाही समावेश होता. रक्त संकलन अकोला ब्लड बँक, अकोला यांनी केले. सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी अभाविप शाखेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. ह्या वेळी सेवार्थ विद्यार्थि चे विदर्भ प्रांत संयोजक अभिषेक भेंडे हे देखील विशेष उपस्थित होते.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कारंजा लाड शाखेच्या वतीने भविष्यातही असे समाजोपयोगी उपक्रम राबवले जातील, असे शाखेच्या प्रमुखांनी सांगितले.