वाशिम : सामाजिक न्याय विभागाअंतर्गत विविध महामंडळ कार्यरत आहे. या महामंडळाकडून लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना उद्योग व्यवसाय सुरू करून रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी लाभार्थ्यांची निवड केल्यानंतर त्यांचे कर्ज मिळण्याबाबतचे प्रस्ताव महामंडळाकडून बँकांकडे पाठविले जातात.
महामंडळामार्फत बँक संलग्नित अनुदान व बिजभांडवल योजना तसेच केंद्र पुरस्कृत कर्ज योजना राबविण्यात येतात. बँक संलग्नित कर्ज प्रकरणामध्ये कर्ज मंजूरी तसेच कर्ज वितरणाचे अधिकार हे संबंधित बँकांना आहे.
अनुदान व बिजभांडवल वितरणाचे अधिकार हे महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयास आहे. तसेच केंद्र पुरस्कृत कर्ज योजनेमध्ये कर्ज मंजूरी व कर्ज वितरणाचे अधिकार हे प्रादेशिक कार्यालय आणि महामंडळाच्या मुख्यालयास आहे. महामंडळाच्या कर्ज योजनेअंतर्गत प्राप्त होणारे कर्ज प्रस्ताव हे अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत जिल्हा लाभार्थी निवड समितीमार्फत निवड झाल्यानंतर विविध बँकांना तसेच केंद्रीय योजनांचे प्रस्ताव प्रादेशिक कार्यालयात पाठविली जातात.
महामंडळाचे सामाजिक न्याय भवन वाशिम येथे जिल्हा कार्यालय आहे. जिल्हा व्यवस्थापक हे महामंडळाचे प्रमुख आहे. समाज कल्याण कार्यालयाचा लाभार्थी निवड प्रक्रिया व लाभार्थ्यांना बँक कर्ज वाटप करण्यात कोणताच सहभाग आणि भूमिका नसते. जिल्हा व्यवस्थापक हे महामंडळामार्फत कर्ज प्रस्ताव स्वीकारणे, कर्ज प्रस्तावांचे स्थळ निरीक्षण करणे, कर्ज प्रस्तावास जिल्हा लाभार्थी निवड समितीमार्फत मंजूरी प्राप्त झाल्यानंतर कर्ज प्रस्ताव मंजुरीसाठी बँकांकडे सादर करणे इत्यादी कार्यवाही करण्यात येते. लाभार्थी निवड करणे व लाभार्थ्यांचे प्रस्ताव बँकेकडे पाठविणे ही कार्यवाही अतिशय पारदर्शी पद्धतीने केली जाते. यामध्ये कुठल्याही मध्यस्थ व्यक्तीस थारा देण्यात येत नाही. तसेच कार्यालयीन कर्मचारीसुद्धा अशा प्रकारामध्ये सामील असल्याचे निदर्शनास आलेले नाही. अशी माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी दिली.