वाशिम : दि.12 ऑगस्ट रोजी केंद्रीय राज्य आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) मा .प्रतापराव जाधव जी यांची यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना उत्तम, सुलभ व पर्यायी आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने, खासदार संजय उत्तमराव देशमुख यांनी भेट घेतली. तालुक्यात 50 खाटांचे आधुनिक आयुष हॉस्पिटल उभारण्याची मागणी केली आहे.
"आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, सिद्धा यांसारख्या पारंपरिक व परिणामकारक वैद्यकीय पद्धतींचा लाभ ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेपर्यंत पोहोचवणे ही आज काळाची गरज आहे. यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील अनेक भागात नागरिकांना मोठ्या अंतरावर आरोग्यसेवा घ्यावी लागते. म्हणूनच, आरोग्य मंत्रालयाकडे ही मागणी केली आहे.
या मागणीमुळे दोन्ही जिल्ह्यांतील सर्व तालुक्यांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर, औषधोपचार, पंचकर्म सुविधा, तसेच आपत्कालीन आरोग्यसेवा उपलब्ध होईल. विशेषतः शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना याचा मोठा फायदा होणार आहे. असे वृत्त मिळाल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले.