राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर रागावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. राग हा आपल्या प्रगती मधील सर्वात मोठा अडथळा आहे. राग आल्यावर माणूस एकाग्रता गमावून बसतो. त्यामुळे यशप्राप्ती होऊ शकत नाही. राग आल्यावर मानवी शरीरातील हार्मोन्स अनियंत्रित होतात. शरीराची लवचिकता कमी होते. राग आल्यामुळे माणसाची स्वाभाविक गतीआणि सुलभता नष्ट होते.
रागामुळेच माणूस आंधळा होऊन इतरांवर चिडतो. वाईट बोलतो. इतरांना शत्रू समजायला लागतो. या सर्वामुळे तो दुःखी होतो. त्यामुळे कोणतेही कारण असले तरी माणसाने राग येऊ देऊ नये. इतरांना अपशब्द बोलू नये. मनुष्य राग करतो, त्यात त्याचे नुकसानच होते. नंतर फक्त उरतो तो असतो पश्चाताप. रागामुळे आपल्या लोकांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि जन्मभराचे सबंध एका क्षणात संपुष्टात येतात.
राग येऊ न देणे, हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. माणसाचा राग हा जास्त वेळ नसतो. राग आल्यावर कुणाला मारुन टाकावे वाटते. कुणाला दगड मारावे वाटते. जर आपणांस राग शांत करायचा असेल तर राग आल्यावर शांत रहायला पाहिजे. त्यावेळी काहीच करु नका. राग शांत होतो. कुणाला मारुन टाकण्याची भावना नष्ट होते. आपले आईवडील आपल्या भल्यासाठीच चांगले सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा राग मुळीच करु नये. आईवडील मुलांचे कधीच नुकसान होऊ नये, हाच विचार करीत असतात. मुलगा सुधारावा, कामधंद्याला लागावा असे त्यांना वाटत असते.
रागामुळे माणसाच्या आरोग्यावर आणि मनावर प्रतिकूल परिणाम होतो तो नुकसानकारक ठरु शकतो. राग आल्यावर ती गोष्टच मनातून आणि विचारातून काढून टाकणे हा श्रेष्ठ उपाय आहे. शरीर आणि मन स्वस्थ असेल तर माणसाला राग येत नाही. मन प्रसन्न असेल तर माणूस आनंदी असेल. तेव्हा माणसाला राग येत नाही. माणूस जेव्हा रागात असतो तेव्हा तो विचारशुन्य होतो, त्यामुळे विवेक राहत नाही. संकल्प सिद्धीस नेण्यासाठी शांत चित्ताची आवश्यकता असते. रागामुळे माणूस अशांत होतो. राग आल्यावर नेमकेपणा हरवतो. आपल्याला नक्की काय करायला पाहिजे, हे त्याला समजत नाही. मी राग किंवा क्रोध या विषयावर माझे मत मांडण्याचा प्रयत्न केला. यामधील विचार आपण आपल्या मनात बसवा आणि जीवन आनंदी बनविण्याचा प्रयत्न करावा.